रेमडेसिव्हर, ऑक्सिजनचा त्वरीत पुरवठा करा - MLA Pharande deemand oxygen supply for covid patient, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडेसिव्हर, ऑक्सिजनचा त्वरीत पुरवठा करा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना रुग्णांवर रेमडेसिव्हर इंजेक्शन प्रभावी उपचार ठरत आहे. त्या पाठोपाठ आता ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने रेमडेसिव्हर इंजेक्शन बरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा करावा.

नाशिक : कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना रुग्णांवर रेमडेसिव्हर इंजेक्शन प्रभावी उपचार ठरत आहे. त्या पाठोपाठ आता ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने रेमडेसिव्हर इंजेक्शन बरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.

शहरातील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी १८ बेड पडून आहेत. तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे नातेवाईकांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे इतर रुग्णालयात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा शहरात मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून, बुधवारी दुपारी बारा वाजल्यापासून रुग्णांचे नातेवाईक वितरकांच्या दुकानासमोर रांगा लावून उभे आहेत. एकीकडे रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होत नसताना दुसरीकडे, मात्र त्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी होत आहेत. रुग्णांना वेळेवर रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध न झाल्यास याचा परिणाम होऊन मृत्यु दरात वाढ होण्याचा धोका असल्याचे आमदार फरांदे यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रशासनाकडून टोलवाटोलवी
अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांच्याशी रेमडीसेव्हर व ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात चर्चा केली असता जिल्हा रुग्णालयाकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास यांच्याकडे विचारणा केली असताना रुग्णालयांना अद्यापही ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात आले. यावरून प्रशासनाकडून ठोस उत्तरे न देता टोलवाटोलवी होत आहे. कोरोना परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे यावरून दिसतं असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख