जळगावला कोरोनाग्रस्तांच्या मृत्युदरात ‘रेड’ मार्क 

गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अहवालात पॉझिटिव्हीटी, रिकव्हरी, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आदी पाच निकषांत आकडेवारी ‘ग्रीन’ मार्क दाखविते तर मृत्युदरात मात्र राज्याच्या तुलनेत अद्यापही जळगाव जिल्हा ‘रेड’ मार्कवरच आहे.
Corona
Corona

जळगाव : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अहवालात पॉझिटिव्हीटी, रिकव्हरी, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आदी पाच निकषांत आकडेवारी ‘ग्रीन’ मार्क दाखविते तर मृत्युदरात मात्र राज्याच्या तुलनेत अद्यापही जळगाव जिल्हा ‘रेड’ मार्कवरच आहे. 

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा गेल्या दोन आठवड्यांपासूनचा आलेख स्थिर आहे. नव्या रुग्णांच्या बरोबरीने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. मार्च २९ ते २५ एप्रिलपर्यंतच्या चार आठवड्यांत ५ ते ११ एप्रिलचा आठवडा वगळता साप्ताहिक रुग्णवाढ स्थिर आहे. २९ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान जिल्ह्यात ७७१६ रुग्ण वाढले, ५ ते ११ एप्रिलदरम्यान ८४८६ रुग्णांची वाढ झाली, १२ ते १८ एप्रिल या आठवड्यात ७५७६ रुग्णवाढ नोंदली गेली तर गेल्या सप्ताहात १९ ते २५ तारखेदरम्यान ७०२१ रुग्ण वाढले व ६२३५ रुग्ण बरे झाले. 

मृत्युदर राज्यापेक्षा अधिक 
पहिल्या लाटेत जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यात व देशातही अधिक होता. कोरोना संसर्गाच्या या टप्प्यातही तीच स्थिती आहे. संसर्ग कमी करण्यात यश मिळत असताना मृत्यूदर घटविण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. १९ ते २५ एप्रिल या गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा मृत्यूदर १.६२ टक्के तर राज्याचा १.५१ टक्के राहिला. 

गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक 
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. सक्रिय रुग्णसंख्याही काही अंशी कमी होत आहे. परंतु, मृत्यूदर कायम असून गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात तब्बल १७३७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ८२० आयसीयूत आहे. उर्वरित जवळपास आठ हजार रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत. 

जळगाव जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास असून, ती फारशी वाढलेली नाही. तर तेवढेच रुग्ण बरेही होत आहेत. मंगळवारी प्राप्त आठ हजार १२३ अहवालांपैकी एक हजार १२ रुग्ण बाधित आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख १८ हजार ९२८ वर पोचली आहे, तर ९९५ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडाही एक लाख पाच हजार ९०१ झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुन्हा २३ जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण बळींचा आकडा दोन हजार १२२ वर पोचला आहे. सारी, नॉन कोविड, न्यूमोनिया, पोस्ट कोविडचा त्रास या कारणांमुळे १६ जणांचा मृत्यू झाला. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com