मराठा मूक आंदोलनासाठी छगन भुजबळांनाही निमंत्रण - invitation given to Chhagan Bhujbal for Maratha March, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मराठा मूक आंदोलनासाठी छगन भुजबळांनाही निमंत्रण

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्याने युवकांच्या भावना तीव्र आहेत.  ही वादळापूर्वीची शांतता आहे. सोमवारी नाशिकला होणाऱ्या मूक आंदोलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निमंत्रीत केले आहे. त्यामुळे छगन भुजबळ या मोर्चात सहभागी होणार का? याची उत्सुकता आहे. 

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्याने युवकांच्या भावना तीव्र आहेत.  ही वादळापूर्वीची शांतता आहे. सोमवारी नाशिकला होणाऱ्या मूक आंदोलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निमंत्रीत केले आहे. त्यामुळे छगन भुजबळ या मोर्चात सहभागी होणार का? याची उत्सुकता आहे. 
 

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह सर्वपक्षीय खासदार, आमदारांना निमंत्रित केले असून, आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. समाजाला खरोखर हक्क मिळवायचे असतील, तर नाशिकचे मूक आंदोलन ऐतिहासिक ठरावे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
 

न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजातील लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेण्यासाठी सोमवारी (ता. २१) खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलनाची हाक दिली आहे. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील मोकळ्या पटांगणावर सकाळी दहा ते दुपारी एकदरम्यान होणारे आंदोलन यशस्वी करण्यासंदर्भात शुक्रवारी औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लॉन्सवर बैठक झाली.
 

...त्यांचा हिशेब ठेवणार
छत्रपतींचा कोल्हापूरइतकाच नाशिक शहरावर विश्‍वास आहे. या मूक आंदोलनासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह सर्वपक्षीय खासदार, आमदारांनाही आमंत्रित करण्यात येणार असून, याद्वारे त्यांची आरक्षणासंदर्भातील भूमिका जाणून घेतली जाणार आहे. या ठिकाणी उपस्थित न राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचा हिशेब ठेवणार असून, आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखविली जाईल. कारण समाजापेक्षा कोणीही मोठे नाही, असे मत करण गायकर यांनी व्यक्त केले. या आरपारच्या लढाईत राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्वच लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे मत बहुसंख्य वक्त्यांनी व्यक्त केले.
 

ड्रेसकोडची घोषणा
सकाळी दहा ते दुपारी एक अशा तीन तास चालणाऱ्या या आंदोनासाठी प्रत्येकाने काळा शर्ट, तोंडाला काळा मास्क परिधान करावा, हे शक्य नसेल तर किमान काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्य समन्वयक करण गायकर यांनी केले. आंदोलन मूक असल्याने कोणत्याही नेत्याच्या समर्थनार्थ घोषणा न देण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

बैठकीला करण गायकर, माजी आमदार जयवंत जाधव, शिवसेनेचे दत्ता गायकवाड, ॲड. शिवाजी सहाणे, राजू देसले, तुषार जगताप, गणेश कदम यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्याबद्धल समाजाच्या तीव्र भावना बहुसंख्य वक्त्यांनी व्यक्त केल्या. रस्त्यावरील आंदोलनापेक्षा केंद्र व राज्य सरकारवर दबाव वाढविण्याची गरजही या वेळी अनेकांनी व्यक्त केली.
....
हेही वाचा...

द्राक्ष क्लस्टरच्या बैठकीत डावलल्याने खासदार भारती पवार संतप्त!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख