आरोग्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटूनही व्हेंटिलेटरची प्रतीक्षाच! - Health Minister`s time limit over, Ventilater still not activate, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटूनही व्हेंटिलेटरची प्रतीक्षाच!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वर्षभरापासून पडून असलेले ११ आणि शिरपूर, दोंडाईचा येथील एकूण १४, असे एकूण २५ व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठकीत दोन दिवसांत व्हेंटिलेटर कार्यान्वित करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिले होते.

धुळे  : येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वर्षभरापासून पडून असलेले ११ आणि शिरपूर, दोंडाईचा येथील एकूण १४, असे एकूण २५ व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठकीत दोन दिवसांत व्हेंटिलेटर कार्यान्वित करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिले होते. मात्र, बुधवारी दोन दिवसांची मुदत उलटल्यानंतरही ११ पैकी नऊ व्हेंटिलेटर सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट असून, तिने घट्ट विळखा घातला आहे. यात रुग्णसंख्या वाढत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजनयुक्त बेड आणि व्हेंटिलेटरच्या सुविधेला मागणी वाढली आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांकडून व्हेंटिलेटरची मागणी होत आहे. आपला रुग्ण जगावा या आशेने नातेवाईक अहोरात्र व्हेंटिलेटरची सुविधा मिळण्यासाठी पळापळ करत आहेत. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा मिळावी म्हणून अनेक रुग्ण वेटिंगला आहेत. आर्थिक क्षमता असलेले रुग्ण सुरत, नाशिक, पुणे, मुंबई येथे व्हेंटिलेटरची सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

व्हेंटिलेटरची स्थिती
असे असताना वर्षभरापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ११, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नऊ, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात पाच अशी एकूण २५ व्हेंटिलेटर विनावापर पडून असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे ठाऊक असूनही सिव्हिलने पूरक सोयी-सुविधानिर्मितीला प्राधान्य दिल्याचे दिसत नाही. एकिकडे रुग्ण-नातेवाइक व्हेंटिलेटरसाठी मरमर करत असताना व्हेंटिलेटर पडून असल्याने शिवसेनेने स्पॉट पंचनामा करत दोषींवर कारवाईची मागणी केली. अनेक संघटनांनी व्हेंटिलेटर वाढीची मागणी केली. दोन दिवसांपूर्वी दौऱ्यावर येऊन गेलेले आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे २५ व्हेंटिलेटर तत्काळ सुरू करण्याची मागणी संघटनांनी केली.

मंत्र्यांच्या सूचनेचे पालन होईल?
या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे यांनी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे सिव्हिलमधील प्रथम ११ व्हेंटिलेटर दोन दिवसांत सुरू करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार डॉ. सापळे यांनी दोन दिवस सिव्हिलमध्ये बैठक घेऊन आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करावे, असे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांत केवळ दोन व्हेंटिलेटर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित नऊ व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ सिव्हिलकडे नाही, असा युक्तिवाद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कायम ठेवला आहे. वास्तविक, पालकमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री टोपे यांनी कोविड उपाययोजनांसाठी दिलेल्या मुबलक निधीतून कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरावीत, त्यासाठी जाहीर प्रकटन करावे, व्हेंटिलेटरसह आवश्‍यक वैद्यकीय सोयी-सुविधा रुग्णांना पुरवाव्यात, तक्रारींचा निपटारा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. असे असतानाही मनुष्यबळाचा मुद्दा रेटून नेला जात असल्याने वर्षभरापासून पडून असलेले व्हेंटिलेटर सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. या स्थितीत डॉ. सापळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आयसीयू, एसीची सुविधा हवी
व्हेंटिलेटरसाठी आयसीयू आणि एसीची सुविधा अपेक्षित असते. कोविड उपाययोजनेसाठी जिल्ह्याला २०२०-२०२१ साठी ३१ कोटी ३५ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यातील मोजक्या व प्रस्तावित काही आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेला वर्ग झालेला १६ कोटींचा निधी पुन्हा घेऊन यंत्रणेने सिव्हिलमध्ये व्हेंटिलेटरसाठी आवश्‍यक सोयी-सुविधांची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री टोपे यांनीही अशीच अपेक्षा दौऱ्यावेळी व्यक्त केली आहे.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख