कालची रोकडोबा तालीम आज बनलीय ऑक्सिजन सेंटर

काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्या पुढाकाराने घडलेय. कोरोनाने सबंध समाजावरच हल्ला केल्याने शतकाची परंपरा असलेल्या येथील ऐतिहासिक रोकडोबा तालमीत त्यांनी मोफत ऑक्सिजन केंद्र सुरु केले. त्यामुळे अनेकांना कोरोनाशी दोन हात करणे शक्य झाले आहे.
Yashomati Thakur
Yashomati Thakur

नाशिक : शोले सिनेमात ठाकूर बलदेवसिंहचा (संजीव कुमार) एक संवाद आहे. `जब जब देश पर दुश्मनोने धावा बोला तब ङम किसानोने अपने औजार पिघलाकर तलवारे बनाई है`. असेच काहीसे येथील काँग्रेस गटनेते शाहू खैरे (Congres leader Shahu Khaire) यांच्या पुढाकाराने घडलेय. कोरोनाने (Fight against Covid19) सबंध समाजावरच हल्ला केल्याने शतकाची परंपरा असलेल्या येथील ऐतिहासिक रोकडोबा तालमीत त्यांनी मोफत ऑक्सिजन (Free Oxygen centre in Nashik`s Rokdoba Gym.)केंद्र सुरु केले. त्यामुळे अनेकांना कोरोनाशी दोन हात करणे शक्य झाले आहे. 

शहरात इस्पितळाची आवाक्याबाहेरची बिले, वेळेवर न मिळणारी इंजेक्शन्स, ऑक्सिजन बेड्सची कमतरता यामुळे आर्थिक व मानसिक कात्रीत सापडलेल्या  कोरोना रुग्णांना एक आशेचा किरण श्री. खैरे यांनी दाखवला. मल्लविद्येची शतकोत्तर परंपरा जपणाऱ्या नाशिकच्या गंगाघाटावरील रोकडोबा तालीम संघातर्फे रोकडोबा कोरोना ऑक्सिजन सेंटरचे उदघाटन महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर याच्या हस्ते झाले. या सेंटरमध्ये २५ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना येथे मोफत ऑक्सिजनचा उपचार दिला जाईल.  

या संकल्पनेबद्दल संयोजक व रोकडोबा तालीमचे अध्यक्ष, महापालिकेतील  काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे म्हणाले की, परिसरात कोरोनाचा प्रचंड प्रमाणावर प्रसार झाल्याने नागरिक आजारी पडत आहेत. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे अशांना इस्पितळात दाखल करण्यासाठी, ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करूनही उपयोग होत नव्हता. ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जुन्या नाशिकमध्ये मोठी आहे. हे पाहून उद्विग्नता आली. शासनाच्या प्रयत्नांना असलेल्या मर्यादा लक्षात आल्या. त्यामुळे आपल्या संस्थेतर्फेच असे ऑक्सिजन सेंटर काढावे हा विचार कार्यकर्त्यांसमोर मांडला. प्रकल्प अवघड होता. पण समाजातील व्यक्ती पुढे आल्या. मोफत सेवा देणारे डॉक्टर, परिचारक, समुपदेशक पुढे आले. कार्यकर्त्यांचे मोठे बळ ही रोकडोबा तालमीची जमेची बाजू असल्याने हा प्रकल्प बघता बघता आकाराला आला. आज येथे ऑक्सिजन उपचार घेण्यासाठी कोरोना रुंगणांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रुंगणांचे प्राण वाचत असल्याने नाशिककरांच्या दुवा मनाला समाधान देणाऱ्या ठरत आहेत. मुख्य म्हणजे महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय हे सेंटर चालवले जात आहे.

या प्रकल्पाच्या उदघाटक नामदार यशोमातीताई ठाकूर यांनी या मानवतावादी प्रयत्नांचे कौतुक केले. कोरोना साथीचे निवारण करण्यासाठी जुन्या नाशिकचे नागरिक आत्मप्रेरणेने एकत्र येतात आणि मोफत ऑक्सिजन सेंटर चालवून लोकांचे प्राण वाचवतात, ही अतिशय आनंद देणारी घटना आहे. नाशिकचे हे कोरोना ऑक्सिजन मॉडेल महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सेंटरला गरज पडल्यास शासनाची मदत तत्परतेने उपलब्ध करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

गेली वर्षभर नाशिक अमरधाम मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र मृतदेहांचे दहन करणाऱ्या आरोग्य रक्षकांचा या वेळी हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी गोविंदशेठ दांडगव्हाळ, माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हा अद्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेविका डॅा. हेमलता पाटील, आमदार हिरामण खोसकर, कर्नल आनंद देशपांडे, सुधीर पैठणकर, डॉ. अतुल वडगावकर, डॉ. सचिन साळवे, माजी उपमहापौर गुलाम शेख, वेदमूर्ती नितिनशास्त्री मोडक आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com