कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सोडू नका - Dont leave illegal practices in covid19 ere, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सोडू नका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कोरोनाच्या महामारीत स्वार्थापलीकडे जाऊन काम करण्‍याची गरज आहे. अशा काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न दिसेल त्याविरोधात कठोर कारवाया होतील, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला.

नाशिक : कोरोनाच्या महामारीत स्वार्थापलीकडे जाऊन काम करण्‍याची गरज आहे. अशा काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न दिसेल त्याविरोधात कठोर कारवाया होतील, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला.

श्री. भुसे यांनी सोमवारी जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. त्या वेळी पंचवटीत बाराशे रुपयांचे रेमडेसिव्हिर २५ हजाराला विक्रीच्या प्रकरणात एका डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील लुटमारीच्या राज्यातील घटनेबाबत ते पत्रकारांशी बोलत होते.

श्री. भुसे म्हणाले, की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सामान्य नागरिक हतबल आहे. अशा काळात स्वार्थापलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. मात्र माणुसकीने वागण्यऐवजी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कुणी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाया कराव्याच लागतील. माणुसकीला काळिमा फासणारे असे कृत्य आहे. या काळातच माणुसकीची गरज असते. आज समाजातील प्रत्येक घक कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहे. अशा स्थितीत सगळ्यांनी सेवाभावी दृष्टीकोणातून वर्तन केले पाहिजे. याबाबत प्रशासनाने देखील गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवावे. गैरप्रकार करणाऱ्यांना अजिबात सोडू नये.

डॉक्टरला पाच दिवसांची कोठडी
पंचवटी परिसरातील नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनेच बाराशे रुपयांत मिळणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी चक्क २५ हजार रुपयांत विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरला सोमवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या तक्रारींवरून रविवारी संशयित डॉ. रवींद्र मुळक (वय ३६, रा. पार्कसाइड होम, अमृतधाम, पंचवटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यानुसार योगेश मोहिते यांच्या कोरोनाग्रस्त नातेवाइकांना तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज होती. त्यासाठी शोधाशोध सुरू असताना रविवारी सायंकाळी त्यांना डॉ. मुळक यांच्याकडे इंजेक्शन असल्याचे समजले. डॉ. मुळक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी एका इंजेक्शनसाठी २५ हजारांची मागणी केली होती. डॉ. मुळक इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याचे लक्षात येताच, मोहिते यांनी इंजेक्शन घेण्याची तयारी दाखवत, रात्री आठच्या सुमारास अमृतधाम येथे भेटण्याचे ठरले. दरम्यान, मोहिते यांनी पोलिस कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी डॉ. मुळक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांच्याकडे तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शन आढळले. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी फसवणूक आणि औषध नियंत्रण किंमत, अत्यावश्यक वस्तू कायदा अशा विविध कलमांन्वये डॉ. मुळक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख