जळगावला कोरोनाचा ‘डाऊनफॉल’ सुरु होणार ?

जिल्ह्यात बारा हजार 500 कोरोना बाधीत रुग्णसंख्या साडेबारा हजार आहे. ही संख्या मोठी आहे. येत्या आठ- दहा दिवसात हा आकडा खाली येण्यास सुरूवात होईल. मात्र प्रशासनाला अधिक सतर्कता बाळगावी लागेल. रुग्णांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
Abhijit Raut
Abhijit Raut

जळगाव : जिल्ह्यात बारा हजार 500 कोरोना बाधीत रुग्णसंख्या साडेबारा हजार आहे. ही संख्या मोठी आहे. येत्या आठ- दहा दिवसात हा आकडा खाली येण्यास सुरूवात होईल. मात्र प्रशासनाला अधिक सतर्कता बाळगावी लागेल. रुग्णांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना बाधीतांच्या ॲक्टीव्ह रुग्णांच्या संख्येने शिखर गाठले आहे. आगामी आठ ते दहा दिवसात ही संख्या खाली येण्यास सुरवात होईल. जिल्हा आरेाग्य यंत्रणेकडे ऑक्सीजनचे पुरेसे बेड नव्हते. मात्र मी स्वतः लक्ष घालून गेले काही दिवस विविध यंत्रणा सक्रीय केल्या आहेत. मोहाडीतील महिला रुग्णालयात पाचशे बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. त्यात शंभर बेडला ऑक्सीजनची सुविधा आहे. दोनशे बेड `सीसीसी` सेंटरमध्ये आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोणालाही ऑक्सीजनची गरज पडली तर त्यांना या रुग्णालयात हलविले जाईल. 

ऑक्सीजनचा काटकसरीने वापर 
जिल्ह्यातील बाधीत रुग्णांना ऑक्सीजन सुविधा करावी लागते. सध्या ऑक्सीजनची रोजची मागणी ४०-४५ टन असते. आपली क्षमता ५० टन ऑक्सीजन साठविण्याची आहे. यामुळेच आपण जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सीजन केवळ वैद्यकीय कामांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 

सध्या कोरोना रुग्णांना ऑक्सीजनची सुविधा दिली जाते. यापुढे वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार ज्यांना गरज असेल त्यांनाच ऑक्सीजन देण्यात येईल. त्याच्या वापराचे प्रमाण कमी करण्यास सांगीतले आहे. गरज असेल तरच ऑक्सीजन द्यावा. ज्यांचे सॅच्यूरेशन ९४ पर्यंत आहे अशांनाही ऑक्सीजन सुरूच असतो. हे चूकीचे आहे. यामुळे गरज असलेल्यांना ऑक्सीजन देण्याचे आदेश आरेाग्य यंत्रणेसह खासगी डॉक्टरांना दिले आहे. भविष्यात ऑक्सीजनची टंचाई जाणवू नये यासाठी आतापासूनच काळजी घेत ऑक्सीजन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

गरजूंनाच ‘रेमडेसिव्हिर’   
सध्या रेमडेसिव्हरचे उत्पादन घटल्याने त्याची टंचाई आहे. असे असताना खासगी डॉक्टर कोणत्याही रुग्णाला ‘रेमडेसिव्हिर’ देण्याचा सल्ला देतात. ‘आयसीएमआर’ या आरोग्य संघटनेने ‘रेमडेसिव्हिर’ कोणत्या रुग्णाला द्यावे याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे पालन डॉक्टरांनी करावे. कोणत्याही रुग्णाला गरज नसताना त्याला ‘रेमडेसिव्हिर’चे इंजेक्शन दिल्यास त्याचे दूष्परिणाम रुग्णाला होऊ शकतात. यामुळे सर्व खासगी डॉक्टरांनी ‘रेमडेसिव्हिर’चा वापर गरजू रुग्णांसाठीच करावा. आता ‘रेमडेसिव्हिर’ रुग्णांच्या नातेवाईकांना लिहून न देता डॉक्टरांनीच त्यांच्या संलग्न औषध दुकानांतून द्यावे. त्याचे बिल रूग्णाला डिस्चार्ज देताना दिले जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णाला ‘रेमडेसिव्हिर’साठी भटकंती करावी लागणार नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘रेमडेसिव्हिर’ नियंत्रण कक्षात फोन करून आपली मागणी नोंदवावी. 

१३१ केंद्रावर लसीकरण 
जिल्ह्यात आज सकाळी चाळीस हजार कोरोना लस उपलब्ध झाल्या. दिवसभरात जिल्ह्यातील १३१ लसीकरण केंद्रावर त्या पोचतील. उद्यापासून (ता. १४) सर्व केंद्रावर लसीकरण सूरू होईल. आगामी तीन दिवस पुरेल एव्हढा हा साठा आहे. ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com