काँग्रेस देणार कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा, बेड, रेमडेसिव्हिर!

जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांना त्वरित मदत मिळावी, यासाठी त्यांना लागणाऱ्या बेडची उपलब्धता, प्लाझमा, रेमडेसिव्हिर आदींची मदत मिळण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारपासून जिल्हा काँग्रेस भवनमध्ये कोरोना मदत केंद्र, वॉररूम सुरु करणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली.
Sandeep Patil, Jalgaon
Sandeep Patil, Jalgaon

जळगाव : जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांना त्वरित मदत मिळावी, यासाठी त्यांना लागणाऱ्या बेडची उपलब्धता, प्लाझमा, रेमडेसिव्हिर आदींची मदत मिळण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारपासून जिल्हा काँग्रेस भवनमध्ये कोरोना मदत केंद्र, वॉररूम सुरु करणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली. 

जळगाव शहरात कोरोनाचा प्रसार होत आहे. त्याला प्रतिबंध करणे हे सर्वांचे काम आहे. या विषयावर वाद-विवाद नव्हे तर एकोप्याने व सेवेच्या भावनेने लढा देण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष नेहेमीच देश असो वा माणुसकीवरील संकटात प्राणपणाने लढला आहे. त्याच भावनेतून आम्ही नागरिकांच्या मदतीसाठी व कोरोनाच्या पराभवासाठी लढा उभारणार आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगराध्यक्ष श्याम तायडे, ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष देवेंद्र मराठे, जमीलभाई उपस्थित होते. 

ते म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसतर्फे कोरोना रुग्णांसाठी सहाय्यता केंद्र कार्यान्वित केले जात आहे. जळगाव जिल्ह्यातही सोमवारपासून हे सहायता केंद्र सुरू होईल. जिल्हास्तरावर कार्यान्वित करण्यात येणाऱ्या या सहाय्यता केंद्रात २४ तास जिल्हा पदाधिकाऱ्यांची एक टीम उपस्थित राहणार आहे. या केंद्रामार्फत रुग्णांना बेडची उपलब्धता, इंजेक्शन मिळण्यात येणाऱ्या अडचणी, रक्त, प्लाझ्माची उपलब्धता याबाबत मदत केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचे नियंत्रण करण्यासाठी मुंबई येथील टिळक भवनात राज्यस्तरीय वॉर रूम तयार करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही वॉर रूम कार्यरत राहील. या वॉर रूमचे समन्वयक म्हणून नितीन पाटील काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सद्यःस्थितीला ९८९०१७२७२२ या क्रमांकावर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी संपर्क साधल्यास त्यांना मदत केली जाणार आहे. 

केंद्र सरकारचा दुजाभाव 
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्रातील भाजप सरकारकडून लसीकरणाच्या विषयावरून राजकारण केले जात आहे. लसींच्या पुरवठ्यात केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कोरोनाच्या या महामारीदरम्यान केंद्र सरकारने राजकारण न करता लसींचा महाराष्ट्राला तत्काळ पुरवठा करावा. जिल्हा काँग्रेसच्या सहायता केंद्रामार्फत ऑक्सिजन भरणाऱ्या कंपन्यांवरही नजर ठेवली जाणार आहे. बेड उपलब्धतेसाठी या केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. 

जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे 
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले  (११ एप्रिल) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) राज्यातील रक्तपुरवठ्याची गरज लक्षात घेता जिल्हा काँग्रेसतर्फे प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर घेणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पाटील यांनी सांगितले. 
..
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com