ब्रेक दि चेन विरोधात मालेगावला कॉंग्रेसचे आंदोलन - Congress agitation against break the chain in Malegaon, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेक दि चेन विरोधात मालेगावला कॉंग्रेसचे आंदोलन

प्रमोद सावंत
बुधवार, 7 एप्रिल 2021

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक दि चेन आदेशान्वये अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. त्या विरोधात  व्यापारी आक्रमक झाले आहेत. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत असल्याने येथे संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.

मालेगाव : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक दि चेन आदेशान्वये अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. त्या विरोधात  व्यापारी आक्रमक झाले आहेत. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत असल्याने येथे संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. निर्बंधांच्या विरोधात कॉंग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढून धरणे आंदोलन झाले. 

यासंदर्भात उफ विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्विकारले. दरम्यान निर्बंध झुगारुन दुकाने उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनता दल व हॉकर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. जनता दलाचे नेते, नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. भाजप प्रणित व्यापारी आघाडी व विविध संघटनांनी मंगळवारी या संदर्भात निवेदन सादर करीत निषेध नोंदविला.

या निर्बंधांमुळे लघु व्यावसायिक व विविध आस्थापना संकटात सापडल्या आहेत. अनेकांचे आर्थिक गणित चुकले आहे. व्यापारी, दुकानदार, कामगार या सर्वांनाच त्याची झळ बसली आहे. व्यावसायिकांना काही प्रमाणात सूट मिळावी, नियमांत शिथीतला आणावी अशी मागणी श्री. शेख यांनी केली. जाचक निर्बंधांमुळे ८० टक्के कामगार असलेल्या शहरातील लघु व्यावसायिक उद्‌ध्वस्त होतील. प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन व्यावसायिकांना परवानगी द्यावी अशी मागणी श्री. शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. किदवाई रस्त्यावरील पक्ष कार्यालयापासून जेएटी विद्यालयापर्यंत मोर्चा काढून त्यांनी धरणे आंदोलन केले. 

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय महाजन, सहाय्यक निरीक्षक मनोहर पगार, शैलेश पाटील व सहकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. श्री. शेख यांनी प्रांताधिकारी शर्मा यांना निवेदन दिले. धरणे आंदोलनात नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, जैनू पठाण, जावेद शेख आदींसह कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जनता दल व हॉकर्स युनियनने किदवाई रस्त्यावर दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. निर्बंधांना विरोध करीत आंदोलन करणारे मुश्‍तकीम डिग्निटी, रिजवान खान, नगरसेवक मन्सुर अहमद, अब्दुल बाकी आदींसह तीसहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. 
आंदोलकांविरोधात गुन्हा
कोरोना प्रतिबंधात्मक नियम व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसचे माजी आमदार रशीद शेख, जनता दलाचे नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांच्यासह दोन्ही पक्षाच्या आंदोलनकर्ते व कार्यकर्त्यांविरुध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. जनता दल कार्यकर्त्यांविरुध्द पोलिसांनी कारवाई केली. 
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख