...आणि छगन भुजबळांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन!

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या समस्यांनी प्रशासन त्रस्त आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी सूचना करुनही काहीही सुधारणा होत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच फोन केला. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या समस्यांनी प्रशासन त्रस्त आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी सूचना करुनही काहीही सुधारणा होत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच फोन केला. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. 

शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तीन दिवसांपासून अन्न-औषध प्रशासनचे आयुक्त परिमल सिंह यांना सूचना केल्यात. त्यानंतरही फरक पडला नसल्याने सोमवारी अखेर श्री. भुजबळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शिवाय श्री. भुजबळ यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली.

केंद्राने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा डबल कोटा केल्यामुळे डबलच्या हिशेबाने तसे वाटप सुरू करण्यात आले. मात्र स्टॉकिस्टने वाढीव इंजेक्शनचा साठा दिलाच नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कमी साठा मिळाला. मात्र मी यात लक्ष घालून नाशिकवर अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्‍वस्त केले. श्री. भुजबळ म्हणाले, की नाशिकला दररोज दहा हजार इंजेक्शनची मागणी असताना ४५० इंजेक्शनचा पुरवठा होतो. त्या तुलनेत ठाणे, पुणे, नागपूरला चौपट म्हणजेच सोळाशे इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या इतर शहरांपेक्षा अधिक असताना नाशिकमध्ये कमी प्रमाणात इंजेक्शन मिळत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

राज्याच्या तुलनेत ६.४८ टक्के रुग्ण
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे समन्यायी पद्धतीने वाटपासाठी राज्यस्तरावरून वाटप करताना सक्रिय रुग्णसंख्या विचारात घेऊन इंजेक्शन वाटपाचे सूत्र निश्‍चित करण्यात आले. त्यानंतर उत्पादकांद्वारे साठा पुढील वितरणासाठी संबंधित जिल्ह्यातील वितरकांकडे प्राप्त होईल. मग सर्व जिल्हाधिकारी हा साठा जिल्ह्यात वितरित करतील, अशा सूचना आहेत. जिल्ह्यातील २० एप्रिलला सक्रिय रुग्णसंख्या राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ६.४८ टक्के असल्याचे दर्शविले असल्याकडे श्री. भुजबळांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

दोन जिल्ह्यांचा नाशिकवर बोजा
धुळे व नगर जिल्ह्यांसाठी देण्यात येणारा रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा नाशिक येथील वितरकांना देण्यात येतो. त्यामुळे हा साठा प्रत्यक्षात इतर जिल्ह्यांना जाणार असला, तरीसुद्धा नाशिकच्या नावे नोंदविला जात असल्याने प्रत्यक्षात नाशिकला कमी साठा उपलब्ध होतो, हे श्री. भुजबळांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com