भाजपचा दादा भुसेंना चिमटा अन् छगन भुजबळांना विनवणी!

मालेगाव शहराची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. घरोघरी कोरोनाचे रुग्ण आहेत. औषधे मिळत नाहीत. उपचाराची सुविधा बिकट झाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे फिर्याद करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. तेव्हा पालकमंत्री साहेब मालेगावकरांची मदत करा हो.
Bhujbal-Gaikwad
Bhujbal-Gaikwad

मालेगाव : मालेगाव शहराची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. घरोघरी कोरोनाचे रुग्ण आहेत. औषधे मिळत नाहीत. उपचाराची सुविधा बिकट झाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे फिर्याद करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. तेव्हा पालकमंत्री साहेब मालेगावकरांची मदत करा हो, असे भावनिक पत्र भाजपचे महानगरप्रमुख मदन गायकवाड यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना लिहिले आहे. 

नगरसेवक मदन गायकवाड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, यंत्रमाग कामगार, मजूर व रोजीरोटीसाठी संघर्ष करणारे शहर कोरोनाच्या विळख्यात जखडले गेले आहे. घरोघरी रुग्ण आहेत. कोरोनाने इथलं दिनमानच उध्वस्त झालं. शहर हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहे. गेली वर्षभर आम्ही लढलो. एक दूसऱ्याची मदत केली. होत ते वाटून खाल्लं पण कोणाचीही चूल विझू दिली नाही. वर्षभर तुम्हाला हाकपण दिली नाही. आजची परिस्थिती वेगळी आहे. सामान्यांना बेड नाही. ऑक्सिजन नाही. रेमडेसिव्हीर मिळेनासे झाले आहे. यामुळे तुमच्या दरबारी फिर्याद करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. तुम्ही तरी मालेगावकरांची मदत करा हो, अशी साद घातली आहे. 

ते म्हणाले, जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. सत्तेत मालेगावला कृषीमंत्रीपद मिळाले आहे. मात्र राज्य पातळीवरची  जबाबदारी, कृषी विभागाचा कामाचा ताण व कोरोना महामारीत बांधावर राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतांना त्यांचा मोठा वेळ जातो. पालकमंत्री या नात्याने आपणच येथील समस्या मार्गी लावाव्यात. रुग्णांना रेमडेसिव्हीर मिळवून द्यावे. यापुर्वी आम्ही गिरीश महाजन पालकमंत्री असताना हक्काने भांडून मागण्या मान्य करुन घ्यायचो. मार्गही काढायचो. आज आम्ही विरोधक असल्याने तुमच्याकडे दाद मागणे एवढाच पर्याय हाती आहे. येथील संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. महानगरपालिका शेकडो कोटींचे ठेके देण्यात व्यस्त आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी कोरोनाच्या बिकट काळात जनतेची मदत करण्याऐवजी ठेक्यातून माया लुटण्यात व्यस्त आहेत. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापणातही लोणी खाण्याचा डाव त्यांनी साधला आहे. त्यांना धडा शिकवा. मालेगावकरांना आपल्याकडून अपेक्षा आहे. या जिवनमरणाच्या संघर्षात आपण  मालेगाव शहराची मदत करावी.


रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी साकडे
शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गरजु रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन सवलतीच्या दरात १२०० रुपयांत उपलब्ध करून द्यावे. रुग्णांना रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, नातेवाइकांची भटकंती थांबेल व संससर्गालाही आळा बसेल. आम्ही मालेगावकर समितीचे निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, राजेंद्र पाटील, अनिल पाटील आदींनी तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांना या मागणीचे निवेदन दिले.
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com