नाशिकमधील गिरीश महाजनपर्व अस्ताकडे... - BJP leader Girish Mahajan Era Ends, Rawal will news leader, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

नाशिकमधील गिरीश महाजनपर्व अस्ताकडे...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 जून 2021

गेली सहा वर्षे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या भाजपची सर्व सूत्रे होती. त्यांनी आपल्या कलाप्रमाणे कारभार हाकला. राज्यात सत्ता असल्याने जिल्हयात पक्षाचे बळ वाढले. परंतु आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी आता जयकुमार रावल यांच्याकडे आली आहेत. 

नाशिक : गेली सहा वर्षे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या भाजपची सर्व सूत्रे होती. (Nshik BJP incharge was Girish Mahajan) त्यांनी आपल्या कलाप्रमाणे कारभार हाकला. राज्यात सत्ता असल्याने जिल्हयात पक्षाचे बळ वाढले. (BJP gain power in various Political institutes) मात्र त्यात माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांसारख्या अनेक जुन्या जाणत्यांचे राजकीय भविष्य संपुष्टात देखील आले. परंतु आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी आता जयकुमार रावल )Jaykumar Rawal will be new incharge) यांच्याकडे आली आहेत. त्यामुळे गिरीश महाजन पर्व अस्ताकडे...असे चित्र आहे.    

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली असून, या तापलेल्या वातावरणाचा पहिलावहिला अध्याय भाजपमध्ये माजी मंत्री व सर्वाधिकार एकवटलेल्या गिरीश महाजन यांना बसला. पुणे येथे शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत सर्व अधिकार प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिकमध्ये महाजनपर्वाचा अस्त होऊन रावलपर्व सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 

२०१७ मध्ये नाशिक महापालिकेत भाजपला सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची संधी मिळाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्ता मिळाल्यानंतर विकासकामे अपेक्षित होती. मात्र अंतर्गत गटबाजीने भाजपला पोखरले. राज्यातील सत्ता गेल्यानंतर तर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी अधिकच वाढली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. 

त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे १४ ते १५ नगरसेवक फुटल्याने पक्षाची इभ्रत वेशीला टांगली गेली. इथपर्यंत पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार गिरीश महाजन यांच्याकडे होते. त्यानंतरही स्थायी समिती सभापती व सदस्य नियुक्ती यात महाजन यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मात्र कालांतराने महाजन यांच्याकडून सूत्रे रावल यांच्याकडे गेली. आतापर्यंत रावल हे प्रभारी होते. पदाचा प्रभारी कार्यभार असल्याने कुठलाही निर्णय घेताना आपल्याला विचारात घेतले जावे, अशी भूमिका त्यांची होती. मात्र गेल्या काही महिन्यांत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. सभागृहनेते व गटनेते पदावर अनुक्रमे कमलेश बोडके व अरुण पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी रावल यांना विचारात घेतले गेले नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली होती. 

पक्ष नेतृत्वाकडे नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे येथील निवासस्थानी शनिवारी (ता. १९) निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते विजय साने, लक्ष्मण सावजी, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रशांत जाधव, गटनेते अरुण पवार आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रत्येकाशी स्वतंत्र बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर सर्वांची एकत्रित बैठक घेऊन यापुढे जयकुमार रावल हेच निर्णय घेतील, अशा स्पष्ट सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. त्यामुळे आता यापुढे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिक शहरातील पर्व संपल्यात जमा झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीला सभागृहनेते कमलेश बोडके यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, यावरून त्यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. 

स्थायी समितीत मनमर्जीने नियुक्त्या  
स्थायी समितीवर माजी सभापती हिमगौरी आडके व माजी महापौर रंजना भानसी यांची नियुक्ती करण्यात आली. सभापतिपदाची निवड झाल्यानंतर दोन्ही सदस्यांचे राजीनामे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत दोघांचेही राजीनामे घेतले न गेल्याने पक्षामध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे व्यक्त करण्यात आल्याचे समजते. त्यावरून दोन्ही सदस्यांचे राजीनामे घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शहराध्यक्ष बदलण्याची शक्यता 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदलदेखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात शहराध्यक्षापद देखील बदलले जाणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून साइड ट्रॅक झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी व विजय साने हे या निमित्ताने सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. त्यात माजी आमदार सानप यांची महत्त्वाची भूमिका ठरल्याचे समजते. 
...

हेही वाचा...

रक्षा खडसे म्हणाल्या, भाजप की राष्ट्रवादी या कुंपणावर बसू नका!

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख