भाजप बंडखोरी; नगरसेवकांना नोटीस आमदार राहिले निमनिराळे - BJP issued notice to corporators, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

भाजप बंडखोरी; नगरसेवकांना नोटीस आमदार राहिले निमनिराळे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन नगरसेवकांची बंडखोरी भाजपची नाचक्की करणारी ठरल्याने डॉ. सीमा ताजणे व विशाल संगमनेरे या दोघांना अखेरीस शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी नोटीस बजावली. 
 

नाशिक : नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन नगरसेवकांची बंडखोरी भाजपची नाचक्की करणारी ठरल्याने डॉ. सीमा ताजणे व विशाल संगमनेरे (Bjp issued notice to Seema tajne & Vishal sangamnere) या दोघांना अखेरीस शहराध्यक्ष गिरीश पालवे (City president Girish Palve) यांनी नोटीस बजावली. मात्र, दोघा नगरसेवकांवर कारवाई करताना या घटनेचे प्रमुख सूत्रधार असल्याची चर्चा असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप (But Ex MLA being safe)  यांना मात्र नामानिराळे ठेवण्याची चाल खेळली आहे.

२०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपचे गेल्या साडेचार वर्षांत वेगवेगळ्या मार्गाने पतन झाले आहे. साडेचार वर्षांत हवीतशी विकासकामे न झाल्याने नागरिकांचा तर रोष आहेच, मात्र संघटना व नगरसेवकांच्या पातळीवरदेखील फारसे काही चांगले वातावरण राहिले नाही. प्रथम महापौरपदाच्या निवडणुकीपासूनच गटबाजीने तोंड वर काढले. तिन्ही आमदारांचे कधी एकमेकांशी पटले नाही. महापालिकेतील सत्तेवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने सर्व राजकारण घडत गेले. पंचवार्षिकमधील दुसऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत असूनही सत्ता मिळवताना नाकीनऊ आले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली जवळपास पंधरा नगरसेवकांचा गट फुटल्याने पक्षवरिष्ठांच्या सत्ता मिळविताना नाकीनऊ आले. त्यानंतर शुल्लक कारणाने भाजपमधील गटबाजी उफाळून आल्याचे दिसले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यात पक्षाला बळकटी देण्याचे काम केले, मात्र आमदार पाटील मुंबईत पोचत नाही तोच गटबाजीने जोरदार उसळी मारली.

लुटूपुटूची कारवाई?
पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र यांना संधी देण्यासाठी पक्ष एकवटला असताना नाशिक रोड प्रभाग समितीमध्ये मात्र भलतेच घडले. सानप समर्थक डॉ. सीमा ताजणे व विशाल संगमनेरे या दोन नगरसेवकांनी निवडणुकीवेळी दांडी मारत शिवसेनेच्या विजयासाठी पायघड्या टाकल्या. नाशिक रोड प्रभाग समिती सभापती निवडणुकीतून भाजपची बंडखोरी समोर आल्यानंतर चुका शोधण्याचे काम सुरू झाले. यात सर्वप्रथम शहराध्यक्ष गिरीश पालवे व गटनेते अरुण पवार यांच्यावर संशयाची सुई फिरली. नाशिक रोड प्रभाग समितीमध्ये समसमान मते असल्याने बंडखोरीची दाट शक्यता होती. त्यामुळे सर्व नगरसेवकांना पक्षादेश अर्थात व्हीप बजावणे गरजेचे होते. मात्र, पालवे व पवार यांनी ही प्रक्रिया पार पाडली नाही. 

पक्षाची नाचक्की झाल्यानंतर ताजणे व संगमनेर यांना तातडीने खुलासा करण्याची नोटीस शहराध्यक्ष पालवे यांनी दिली. मात्र, या नोटीसच्या माध्यमातून ही लुटूपुटूची कारवाई असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार सानप यांच्यावर दोन्ही नगरसेवकांना घेऊन येण्याची जबाबदारी असताना ती त्यांनी सक्षमपणे पार पाडली नाही. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना त्यांना मात्र नामानिराळे ठेवण्यात आल्याचा आरोप पक्षात होत आहे.

अहवाल प्रदेश पातळीवर
माजी मंत्री गिरीश महाजन यांची जबाबदारी कमी करत जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. रावल यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती सभापतीची पहिलीच निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सत्ता येण्याची संधी असतानादेखील बंडखोरीमुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग समिती सभापतीची निवडणूक फारशी महत्त्वाची नसली तरी दोन नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये भाजपमध्ये गटबाजी असल्याचा संदेश पोचला आहे. यामागे प्रभारी जयकुमार रावल यांचे अपयश असल्याचे बोलले जात आहे.

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या हातून सत्ता जात असताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवस तळ ठोकून पुन्हा सत्ता आणून भाजपची इभ्रत वाचविली होती. जयकुमार रावल सानप यांच्या भरवशावर राहिल्याने पक्षाला दगाफटका सहन करावा लागला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर पुन्हा गटबाजीला खतपाणी घालण्यात येत असल्याचा आरोप बाळासाहेब सानप यांच्यावर होत असून, त्यांच्या या कृतीचा सर्व अहवाल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी पाठविला आहे. 
...
हेही वाचा...

बच्चू कडू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख