अनिल घनवट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून बाहेर पडावे - Anil Ghanvat shoulf leave SC Farmers Commity deemand Farmers leader | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल घनवट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून बाहेर पडावे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भुपेंद्रसिंह मान सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून बाहेर पडले आहेत. याचा विचार करुन शेतकरी चळवळीच्या हितासाठी अनिल घनवट यांनी देखील समितीतून बाहेर पडावे. 

नाशिक : केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे अडचणीचे आहेत. त्याला आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून देखील संदेश गेला आहे. यासंदर्भात शेतकरी चळवळीचा दबाव कायम राहण्याची गरज आहे. त्यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भुपेंद्रसिंह मान सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून बाहेर पडले आहेत. याचा विचार करुन शेतकरी चळवळीच्या हितासाठी अनिल घनवट यांनी देखील समितीतून बाहेर पडावे असे आवाहन शेतकरी नेते संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी केले आहे.    

यासंदर्भात त्यांनी पत्रक काढले आहे. त्याचा आशय असा, शेतकरी विरोधी तीन कायद्यासंदर्भात केंद्र सरकार सोबत शेतकऱ्यांची चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन कायदे अन याबाबत समितीने कधीही नकारात्मक भूमिका दर्शवली नाही. मात्र केंद्र सरकारचे तीन्ही कायदे वादग्रस्त ठरले आहेत. सरकारने देखील या कायद्यातील त्रुटी मान्य केल्या आहेत. या विरोधात शेतकरी दीड महिन्यापासून रस्त्यावर बसलेले आहेत. हे कायदे सरकारने केले असल्याने ते सरकारनेच रद्द केले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. कायदे रद्द व हमीभाव कायदा ह्या मागण्यांवर अनेक क्लृप्त्या लढवून देखील शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत हे पाहून पडद्याआडून केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयाकडून समितीचा घाट घातला आहे अशी आमची धारणा आहे. 

ते म्हणाले, या समितीतून अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भुपेंद्रसिंह मान बाहेर पडले आहेत. त्यांच्या या भुमिकेचे स्वागत केले असून राज्यातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी देखील या समितीतून बाहेर पडावे व सरकारी समितीपेक्षा चळवळीसोबतची निष्ठा दाखवावी असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी केले आहे. अनिल घनवट हे देखील एका संघटनेचे अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांची देखील संघटना रस्त्यावर उतरत असते. वैचारिक भुमिका वेगवेगळ्या असू शकतात मात्र अनेक संघटना रस्त्यावर असताना एखाद्या संघटनेने प्रश्न सोडविण्यासाठीचा देखावा केलेल्या समितीचे प्रतिनिधीत्व करणे हे चळवळीसाठी घातक आहे.

 

ते पुढे म्हणाले की, सरकार असा दिखावा करून चळवळ मोडीत काढू पहात आहे. भविष्यात शेतकरी संघटनेला देखील शेतकऱ्यांचा एखांदा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ शकते अशावेळी संघटनेपेक्षा वेगळी भुमिका असणार्‍यां चळवळीतील प्रतिनिधींनी प्रश्न सोडविण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये सहभाग घेतलेला शेतकरी संघटनेला देखील चालणार नाही. मुळात चळवळीतील नेत्यांनी एकमेकांच्या आंदोलनामध्ये ढवळाढवळ करणे हेच एकुण लोकशाहीतील आंदोलन करण्याच्या भुमिकेला कमकुवतपणा आणण्याचे लक्षण आहे. त्यामुळे अनिल घनवट यांनी सद्सदविवेक बुध्दीने सदर समितीचा त्याग करावा असे जाहीर आवाहन मी करीत आहे असे गिड्डे-पाटील यांनी म्हटले आहे.
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख