खासदार हेमंत गोडसे म्हणाले, `रस्ता दुरूस्ती होईपर्यंत टोल बंद करा!`

नाशिक -मुंबई महामार्गावर झालेल्या खड्ड्यांची दखल घेत नाशिक ते कसारा दरम्यानच्या महामार्गाच्या दुरावस्थेची खासदार हेमंत गोडसे यांनी पाहणी केली. या रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन आजपर्यंन्त प्रवाशांचे बळी गेले आहेत.
Hemant Godse
Hemant Godse

घोटी : नाशिक -मुंबई महामार्गावर (Nashik- Mumbai Highway) झालेल्या खड्ड्यांची दखल घेत नाशिक ते कसारा दरम्यानच्या महामार्गाच्या दुरावस्थेची खासदार हेमंत गोडसे यांनी पाहणी केली. या रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन आजपर्यंन्त प्रवाशांचे बळी गेले आहेत. अजून किती प्रवाशांचे प्राण जाण्याची आपण वाट बघणार आहात, असे खडेबोल खासदार गोडसे यांनी महामार्ग प्रशासनाला सुनावले. 

यावेळी त्यांनी ९९ किलोमीटरचा रस्ता महिनाअखेर पर्यन्त दुरुस्त झालाच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रीय महामार्गाची गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबराचा थर पुर्णत: निघून गेलेला आहे. महिनाभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे काही किलोमीटर अंतरावरील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. 

अनेक ठिकाणी महामार्गाला असणाऱ्या साईडपट्ट्या आणि कॅटआय नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सकाळने याबाबत सविस्तर वृत्त दिले होते. पाहणी दौऱ्याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे बी. एम. साळुंके, व्यवस्थापक दिलीप पाटील, आर्टिफॅक्टचे महेंद्र सूर्यंवशी, टोल प्रशासनाचे गिरीश कदम आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घोटी, इगतपुरी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना दाखविले खड्डे
या वृत्ताची दखल घेत खासदार गोडसे यांनी अधिकाऱ्यांसह गोंदे ते वडपे दरम्यानच्या महामार्गाची विशेष पाहणी केली. नॅशनल हायवे आणि टोल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दुरावस्था झालेल्या गोंदे फाटा, मुढेंगाव फाटा, भंडारदरा फाटा, घोटी, भावली फाटा, घोटी वाहतूक टॅप, इगतपुरी, हॉटेल मानस, कसारा घाट या ठिकाणी घेऊन जात अवस्था दाखविली. गोंदे फाटा ते कसारा या महामार्गालगत अनेक ठिकाणी कॅटआई, साईनबोर्ड, साईडपट्ट्या नसल्याचे खासदार गोडसे यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

साईडपट्टी कुठेच का नाही ?
महामार्गालगत दोन्ही बाजूला पाच फूट डांबर आणि पाच फूट मुरूम अशी साईडपट्टी असायलाच हवी, मग ९९ किलोमीटच्या दरम्यान साईडपट्टी कुठेच का नाही असा संतप्त सवाल खासदारांनी अधिकाऱ्यांना केला. अनेक ठिकाणी महामार्गावर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्यामुळे अपघात होत अनेकांचा बळी जात आहे. काहींना अपंगत्त्व आले आहे. या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न देखरेखीची जबाबदारी असलेल्या आर्टीफॅक्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि टोल प्रशासनाला करीत खासदारांनी धारेवर धरले.

तोपर्यत टोल घेऊ नका
येत्या २८ ते ३० तारखेच्या आत संपूर्ण महामार्ग शंभर टक्के सुविधांसह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झालाच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा गर्भीत इशारा वजा सूचनाही श्री. गोडसेंनी दिल्या. महामार्गावर सुरक्षित प्रवास होण्यासाठी आपण शासनाशी झालेल्या करारात स्पष्ट केलेल्या बाबी आणि सुविधा देत नसताना टोलवसुली करणे अयोग्य असून नैतिक जबाबदारी म्हणून महामार्गाचे काम होत होईपर्यत टोल वसुली करणे थांबवावी असेही खासदारांनी बजावले.
...
हेही वाचा...

केंद्र सरकारचे राजकारण ओबीसींना संकटाकडे नेणारे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com