पालकमंत्री अब्दुल सत्तार हे फक्त बिर्याणीसाठीच धुळ्याला येतात का?

रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत.
Guardian Minister Abdul Sattar Does  come to Dhule only for biryani?
Guardian Minister Abdul Sattar Does come to Dhule only for biryani?

धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर आहे. सर्वत्र रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यासाठी रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत. या स्थितीत पालकमंत्री आहेत कुठे, ते फक्त बिर्याणीसाठी धुळ्यात येतात का, असा संतप्त सवाल सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी (ता. २२ एप्रिल) स्थायी समितीच्या सभेत केला.

काही फोटोछाप, पत्रकबहाद्दर भाजपच्या नगरसेवकांवर आरोप करून त्यांच्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. अशा पत्रकबाजांच्या निषेधाचा ठराव करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. तसा ठरावही सभापतींनी सभेत पारीत केला. सभापती संजय जाधव अध्यक्षस्थानी होते. उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक शीतल नवले, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, कमलेश देवरे, सुनील बैसाणे, नगरसेविका किरण कुलेवार, भारती माळी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बोरसे आणि मासुळे म्हणाले, की गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी जीव धोक्यात टाकून काम करीत होते. तेव्हा पत्रकबाज कोठे होते? शिवसेनेसह पालकमंत्र्यांनी काय काम केले ते दाखवावे. त्यांचा सत्कार करू. या स्थितीत शिवसेनेने राजकारण करू नये. बोरसे यांनी पालकमंत्र्यांमुळे दलित वस्तीचा निधी परत गेल्याचे सांगितले.

नवले म्हणाले, की शिवभोजन थाळीबाबत सरकराचे श्रेय शिवसेना घेत आहे. पालकमंत्र्यांनी नगरोत्थान योजनेचा १५ कोटींचा निधी दुसरीकडे वळविला. रेमडेसिव्हिरच्या काळ्याबाजारावर नियंत्रण नाही. 

पटेल यांनी अतिसाराच्या आजाराचा मुद्दा मांडत उपाययोजनांची मागणी केली. सभापती जाधव म्हणाले, की केवळ भाजपच्या बदनामीसाठी पत्रके सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा उद्योग विरोधक करीत आहेत. सत्ता असूनही विरोधक विद्युत दाहिनी, रेमडेसिव्हिरचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. याबाबत पत्रक काढणारे पालकमंत्र्यांना जाब विचारू शकत नाही. 

बैसाणे यांनी केवळ विरोधाला विरोध करू नका. ही राजकारण करण्याची वेळ नाही, मनपाने हवेबाबत ऑक्सिजननिर्मितीचा प्रकल्प तयार करावा, त्यासाठी नगरसेवक निधी देतील, असे सांगितले. नगरसेविका किरण कुलेवार यांच्या मागणीनुसार नाशिकच्या दुर्घटनेतील मृतांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
अंत्यविधीसाठी पैसे घेणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाका

देवपूरमध्ये भूमिगत गटारीचे काम होताना काही ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या, खड्डे जैसे- थे असल्याने नागरिक त्रस्त आहेत. मात्र, महिन्यापासून ठेकेदारासह त्याची यंत्रणा गायब झाल्याचे देवरे म्हणाले. तसेच अंत्यविधीसाठी नातेवाइकांकडून पैसे घेणाऱ्या आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नवले यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com