सत्ताधाऱ्यांना तुकाराम मुंडेंची का झाली आठवण...  - Tukaram Mundhe Pattern corona Nagpur Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ताधाऱ्यांना तुकाराम मुंडेंची का झाली आठवण... 

राजेश प्रायकर
शनिवार, 27 मार्च 2021

‘मुंढे पॅटर्न'चीच मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.

नागपूर : सत्ताधारी आणि तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष संपूर्ण शहरवासींनी बघितला. कोरोनावर नियंत्रणासाठी मुंढेंनी उचललेल्या पावलावर सडकून टिका करण्याची कुठलीही संधी न गमावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही आता त्यांनी केलेल्या उपाययोजनांची आठवण होत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनासंबंधी दररोज प्रसारमाध्यमे किंवा ‘फेसबुक लाईव्ह'द्वारे जनतेपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्याच्या ‘मुंढे पॅटर्न'चीच मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. कोरोनाचा ज्वर वाढला आहे. त्यामुळे लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिका प्रशासनाकडून कोरोनामुळे गंभीर झाल्यास अँम्बुलन्स कुणाकडे मागावी? कुठल्या रुग्णालयात बेड रिकामे आहे? ऑक्सिजनयुक्त, व्हेंटीलेटरयुक्त बेड कुठे मिळेल? याबाबत कुठलीही माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जास्त चिंतेचे वातावरण आहे. 

जून, जुलै, ऑगस्टमध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रसारमाध्यमे तसेच फेसबूक लाईव्हद्वारे जनतेपर्यंत कोरोनासंबंधी उपाययोजनांचीच माहितीच नव्हे तर त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचाही प्रयत्न केला. त्यांचा शेवटच्या कर्मचाऱ्यावर असलेल्या वचक नागरिकांना दिलासा देणारा होता. परंतु त्यांनी सत्ताधाऱ्यांशी कधीही जुळवून घेतले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही त्यांच्या अनेक निर्णयावर टिका केली. ते एककल्ली वागत असल्याचेही सांगितले.

आता कोरोनाच्या काळात त्यांनीच केलेल्या उपाययोजनांची मागणी काल सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ नगरसेवक व आमदार प्रवीण दटके यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. दटके यांनी जनतेपर्यंत कुठलीही माहिती प्रशासन पोहोचवित नसल्याचा आरोप केला. दटके यांनी काल प्रशासनाने दररोज प्रसारमाध्यमाद्वारे तसेच इतरही शक्य माध्यमाद्वारे शहरात किती रुग्णालयांत किती बेड आहेत? व्हेंटीलेटरयुक्त, ऑक्सीजनयुक्त बेड तसेच आयसीयूबाबत दररोज सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याची आग्रही मागणी केली. त्यांनीच नव्हे तर सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, दिव्या धुरडे, माजी महापौर नंदा जिचकार, महेंद्र धनविजय या सत्ताधारी बाकावरील साऱ्यांनीच कोरोनाच्या उपाययोजनांवरून ढिम्म प्रशासनावर आगपाखड केली. या सर्वांनीच प्रशासनाला धारेवर धरताना मुंढेंनी केलेल्या उपाययोजनांचीच मागणी केली. त्यामुळे काल सभागृहादरम्यान तुकाराम मुंढे यांच्या कामाची अनेकांनी आठवण झाली नसेल तर नवलच!

तुकाराम मुंढे प्रशंसांकडूनही आगपाखड
 कॉंग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी तुकाराम मुंढे यांचे मोठे प्रशंसक होते. मुंढेंवर टिका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधातही चौधरी यांनी आंदोलन केले. त्यांनीही काल दटके यांच्या स्थगनवर बोलताना प्रशासनाकडून व्हेंटीलेटर कुठे आहे? याबाबत काहीही माहिती दिली जात नसल्याबाबत संताप व्यक्त केला. कोरोनाच्या उपाययोजनांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख