"Lockdown will not be observed." | Sarkarnama

''लॉकडाउन पाळणार नाही..'' 'या' कार्यकर्त्यांनी घेतली शपथ 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी व्यापाऱ्यांना व नागरिकांना सांगून सर्वसामान्य जीवन सुरू करण्याचे आवाहन केले. 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी करून प्रतिसाद दिला. औरंगाबाद शहरात या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये आवाहन केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी व्यापाऱ्यांना व नागरिकांना सांगून सर्वसामान्य जीवन सुरू करण्याचे आवाहन केले. 

गोर गरिब जनता, फळवाले, भाजीवाले, टपरीवाले व हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी काल ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आवाहन केले होते की लोकांनी १ ऑगस्ट पासून आपला व्यवसाय सुरळीत सुरू करावा. तसेच ३ तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे राखी विक्री सुरळीत व्हावी, तसेच बहिणीला राखी बाधंण्यासाठी आपल्या माहेरी जाता यावे, त्यामुळे शनिवारपासून सरकारचा कसलाच लॉकडाउन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यानी घेतली.

 

वंचितचे औरंगाबाद शहर अध्यक्ष संदिप शिरसाठ यांनी लोकांना सर्वसामान्य जीवन जगण्यास सुरवात करावी म्हणून आवाहन केले. या वेळी दत्ता सुत्रावे, धनंजय भावले, नितीन साळवे, स्वप्नील गायकवाड, गुड्डु वाहुळ, राऊत, किरण गंगावणे, विशाल सोनवणे, स्वप्नील पाटील व व्यापारी मंडळी उपस्थित होते.

सरकारने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचीत बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे  प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले आहेत. यामध्ये काम करणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मालकांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच लॉकडाउन तोडो अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने काल रात्री अकोला जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण व्यावसायिक या लॉकडाउन तोडो अभियानात सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडीच्या भुमीकेसोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते, अशी माहिती राज्याचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

 Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख