"दारूबंदी'च्या मुद्यावर गृहमंत्री देशमुखांचा वडेट्टीवारांना खो !  - Home Minister Deshmukh defeats Vadettiwar on 'alcohol ban' issue! | Politics Marathi News - Sarkarnama

"दारूबंदी'च्या मुद्यावर गृहमंत्री देशमुखांचा वडेट्टीवारांना खो ! 

प्रमोद काकडे 
शनिवार, 6 जून 2020

चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी समीक्षा समितीचे गंठन केले. यात सामान्य जनतेकडून अभिप्राय जाणून घेतले.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयावर पुढच्या काळात जनतेशी चर्चा केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दारूबंदी समीक्षा समितीच्या अहवालाचे नेमके काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याच अहवालाच्या आधारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदीवर लवकरच 'ठोस' निर्णय घेतला जाईल, असे सांगत आहे. दुसरीकडे गृहमंत्री पुन्हा जनतेशी चर्चा करू, असे बोलत आहे. त्यामुळे आगामी काळात दारूबंदीवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. 

बहुजन कल्याण तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी समीक्षा समितीचे गंठन केले. यात सामान्य जनतेकडून अभिप्राय जाणून घेतले.

समितीकडे आलेले 85 टक्के अभिप्राय दारूबंदी उठविण्याच्या बाजूचे आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार होता. परंतु कोरोनाचे विघ्न आले आणि तळीरामांच्या उत्साहावर पाणी पडले. 

दरम्यानच्या काळात याच अहवालाचा आधार घेत वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविणार असे संकेत देत होते. मागील आठवड्यात एका पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. त्यानंतर वडेट्टीवारांनी दारूबंदीवर लवकरच 'ठोस' निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. दारूबंदी उठणार, अशी चर्चा जोरात असतानाच आज शनिवारला पहिल्यांदाच गृहमंत्री देशमुख कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने चंद्रपुरात आले. 

अपेक्षेप्रमाणे त्यांनी दारूबंदीवर भाष्य केले आणि नव्या चर्चेला सुरवात झाली. कोरोनानंतर दारूबंदीचा निर्णयावर जनतेची मते जाणून घेऊ, असे गृहमंत्री म्हणाले. दारूबंदी उठवायची असेल तर गृहखात्याचा अभिप्राय महत्वाचा आहे. मात्र या खात्याचे मंत्रीच पुन्हा जनतेची मते जाणून घेण्याबाबत बोलत आहे. त्यामुळे दारूबंदी समिक्षा समितीच्या अहवालाला केराची टोपली दाखविली जाईल, अशी भीती मद्यविक्रेत्यां पसरली आहे. 

विशेष म्हणजे उत्पादन शुल्क खाते राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी अद्याप चंद्रपूरच्या दारूबंदीवर भाष्य केलेले नाही. परंतु गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. परिणामी येत्या काळात चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस समोरासमोर येऊ शकतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दारूबंदीच्या निर्णयाचा फटका भाजपला बसला. दारूबंदी असतानाही दारूचा अवैध पुरवठा या जिल्ह्यात सुरूच आहे. 

जनता दारूबंदी उठविण्याच्या बाजूने आहे, याची खात्री सत्ताधारी पक्षाला आहे. त्यामुळे दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचे श्रेय कॉंग्रेसचे वडेट्टीवार यांना जाऊ द्यायचे नाही. दारूबंदी हटविण्याच्या श्रेयात आपला 'वाटा' असावा,यासाठी राष्ट्रवादीची ही खेळी आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख