म्हणून नितीन गडकरींनीच पंतप्रधान व्हावं, असं अनेकांना वाटतयं... - for these reasons nitin gadkari should become PM trend is viral | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

म्हणून नितीन गडकरींनीच पंतप्रधान व्हावं, असं अनेकांना वाटतयं...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

कोरोनाच्या संकटात गडकरींची धडाडी आणि वेगळेपण अनेकांना जाणवले....

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या संकटाचा सामना कोरोनाच्या निमित्ताने (Covid2019) करत आहेत. देशातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधताना मोदींसारखा नेता हवा, असे उत्तर सर्वसामान्य जनतेकडून मिळत असे. त्यांचे काही कट्टर पाठिराखे तर मोदींना विष्णूच्या रुपातच पाहतच होते. असा अफाट विश्वास आणि समर्थन असलेले मोदी हे एकमेव नेते सध्या आहेत. कोरोनाची मार्च 2020 मधील पहिली लाट यशस्वीरित्या रोखल्याचा शिरपेच त्यांनी मिरवला. लाखो मजूरांचे हाल झाले, अर्थव्यवस्था रूळावरून घसरली तरी मोदींनी पहिल्या लाटेत यश मिळवले, यावर अनेकांनी विश्वास ठेवला. (First setback for brand Modi in last seven years)

मार्च 2021 पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या संकट वाढले. रुग्णांना बेड मिळेना, बेड मिळालेल्यांना रेमडिसिव्हिर सारखे औषध मिळेना, आॅक्सिजनअभावी रुग्ण दगावू लागले. स्मशानभूमीतील जळत्या मृतदेहांचे फोटो पाहून सामान्य जनतेचा थरकाप होऊ लागला. लशीसाठी रांगा लागू लागल्या आणि या साऱ्या परिस्थितीत मोदी कुठे? तर ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात, अशी टीका होऊ लागली. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये सरकारला झोपडू लागली. हे संकट कमी म्हणून की काय पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जीवतोड प्रचार करूनही भाजपला तेथे भ्रमनिरास झाला आणि ममता बॅनर्जी मोदींना पुरून उरल्या. या दोन्ही ठिकाणी खालावलेल्या कामगिरीमुळे गेल्या सात वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत मोदी ब्रॅंडला पहिल्यांदा धक्का बसला. 

गडकरी यांच्या नावाची चर्चा...

दुसरीकडे कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्याचे अधिकार असलेले आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावरही टीका होऊ लागली. ही परिस्थिती कोण हाताळू शकेल, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर आरोग्य खाते हे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे द्यावे, अशी सूचना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. त्याला महाराष्ट्रातून नीता केळकर यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला. स्वामी हे मोदींचे टीकाकारच आहेत. त्यातून त्यांनी हा सल्ला दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कोरोना काळातील ढासळलेली परिस्थिती पाहून अनेकांनी त्यांच्या विधानाला पाठिंबा दिला. गंगा शुद्ध करण्यासाठी परिश्रम घेणारे, देशातील रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी धडाकेबाज काम करणारे म्हणून गडकरींची प्रतिमा आहेच. याशिवाय अशा संकटात सामोरे जाण्यासाठी लागणारा निर्धारही त्यांच्याकडे असल्याने त्यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली. ती एवढ्यावरच थांबली नाही. त्यांना आरोग्यमंत्री नाही तर देशाचे पंतप्रधान करावे, असा ट्रेंड सुरू झाला.

भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या

त्याला निमित्त घडले ते नागपूरमधील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात राजकारण करू नका आणि जनतेला केलेल्या मदतीच्या श्रेयासाठी धडपड करू नका, असा थेट सल्ला गडकरींनी दिला. सध्या केंद्र सरकार विरुद्ध भाजपविरोधी राज्य सरकारे असा संघर्ष पेटला आहे. महाराष्ट्रात भाजप नेते हे ठाकरे सरकारवर रोज टीका करत आहेत. संकटाच्या काळात टीका करू नका, काम करा असा सल्ला गडकरींनी दिल्याने त्यांच्या विचारांतील प्रगल्भता आणखी उठून दिसली. गडकरींचे हे विधान भाजपच्या काही मंडळींना रुचले नसेल. पण सर्वसामान्य जनतेला नक्कीच आवडले. कारण जनतेला राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष दिलासा मिळण्याची गरज आहे. राजकीय पक्षांच्या या भांडणातून जनतेला उबग आला आहे. हे गडकरी यांनी बरोबर ओळखले आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या द्यायला त्यांनी कमी केले नाही.

पक्षविरहित मदत..

पक्षविरहीत मदत करण्यासाठीही त्यांची खाती आहे. अनेक राज्यांत भाजपविरोधी सरकारे आहेत. मात्र कोणतेही सरकार गडकरी यांच्या खात्याकडून आमच्यावर अन्याय होतो, अशी तक्रार करू शकत नाही. उलट गडकरी मागेल तेवढा निधी देतात आणि रस्त्यांची कामे मार्गी लावतात, असा अनुभव अनेक मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितला. सर्वपक्षीय खासदारांत ते लोकप्रिय आहेत.  मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे जनतेला माहीत सुद्धा नाहीत. याउलट गडकरी यांचे काम खेड्यापाड्यात दिसते आहे.  त्यामुळे त्यांची प्रतिमा आणखी उंचावली आहे. गडकरी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अनेक तक्रारी मध्यंतरी होत्या. मात्र कोरोना काळात दौरे कमी झाल्याचा उपयोग त्यांनी तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी केला. कार्यकर्त्यांनीही तसेच करावे आणि आधी स्वतःची तब्येत सांभाळावी, असा सल्ला त्यांनी दिला. 

ही बातमी वाचा : पक्ष विसरून काम करा... श्रेयासाठी झेंडे नको : गडकरींच्या कानपिचक्या

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख