कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक...मोबाईल टॅावर तोडण्याचा प्रयत्न.  - swabhimani aggressive against agriculture act, attempt to break mobile tower | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक...मोबाईल टॅावर तोडण्याचा प्रयत्न. 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 डिसेंबर 2020

प्रशांत डिक्कर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी सात वाजता जिओ मोबाईल टॅावर तोडण्याचा प्रयत्न केला. सावळा फाट्यावर हा प्रकार झाला. 

संग्रामपूर (बुलढाणा) : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलं आहे. त्यांचे पडसाड आता गावपातळीवर उमटू लागले आहेत. शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्श अध्यक्ष प्रशांत डिक्कर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी सात वाजता जिओ मोबाईल टॅावर तोडण्याचा प्रयत्न केला. सावळा फाट्यावर हा प्रकार झाला. 

बुलढाणा पोलिसांनी प्रशांत डिक्कर व त्यांच्या कार्यकर्त्यांना याप्रकरणी अटक केली आहे. मोदी सरकारचा निषेध असो, अदानी, अंबानींना पोसणाऱ्या मोदींचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. 
अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्र सरकार दिल्ली आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी प्रशांत डिक्कर यांनी केला.  

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा जळगाव शेगाव रोडवरील सावळा फाट्यावर जिओ टावर तोडण्याचा प्रयत्न केला. अदानी अंबानीची भागिदारी असलेल्या मोदी सरकारची हुकमशाही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, जोपर्यंत केंद्र सरकार दिल्ली आंदोलनाची दखल घेणार नाही, काळे कायदे रद्द होणार नाहीत. तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा प्रशांत डिक्कर यांनी सरकारला दिला आहे. 

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज अठरावा दिवस असून, आंदोलनाचा जोर आणखी वाढत आहे. या आंदोलनावरुन हरियानातील भाजपचे सरकार अडचणीत आले आहे. सरकारमधील घटक पक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) नेते व उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी काल थेट संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. या चर्चेनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मोठे विधान केले आहे. 

शेतकरी आंदोलकांवर बळाचा वापर करण्यावरुन हरियानातील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे टीकेचे धनी बनले आहे. खट्टर यांचे सरकार हे जेजेपीच्या पाठिंब्यावर टिकून आहे. जेजेपीचे नेते व उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनीही शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारला इशारा दिला होता. केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांना हमी भाव न मिळाल्यास आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे चौटाला यांनी सुनावले आहे. 

जेजेपीचे संस्थापक अजय चौटाला आणि इतर नेत्यांनीही भाजपला वारंवार इशारा दिला आहे. जेजेपीचा मतदार हा प्रामुख्याने शेतकरी वर्ग आहे. आता आपलाच मतदार वर्ग आपलेच सरकार सत्तेवर असताना आंदोलन करीत असल्याने पक्षात अस्वस्थता आहे. शेतकरी आंदोलनाचा जोर वाढत असून, जेजेपीतील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे. हे आंदोलन आणखी वाढल्यास याचा सर्वांत मोठा फटका जेजेपीला आगामी निवडणुकांत बसणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख