'स्वाभिमानी'चे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर - Swabhaimani MLA Devendra Bhuyar Shared Dias with NCP Leader Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

'स्वाभिमानी'चे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सध्या मधूर संबंध आहेत. पण शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कधी हजेरी लावली नाही. भुयार यांनी मात्र यापेक्षा वेगळी भूमीका घेत आपली आगामी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने असेल हे स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संवाद यात्रेदरम्यान भुयार यांनी पाटील यांचे स्वागत करत थेट सभेच्या व्यासपीठावर जाऊन भविष्यातील राजकीय संकेत तर दिले नाहीत ना? या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सध्या मधूर संबंध आहेत. पण शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कधी हजेरी लावली नाही. भुयार यांनी मात्र यापेक्षा वेगळी भूमीका घेत आपली आगामी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने असेल हे स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष या नात्याने भुयार उपस्थित राहिल्याचे सांगण्यात येते. मात्र, या महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेचा कोणताही नेता जयंत पाटील यांच्या संवाद यात्रेत सहभागी नव्हता, याकडेही लक्ष वेधण्यात आले. भुयार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालिन कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे ते जायंट किलर ठरले होते. 

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली. मोर्शीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी पाटील यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्षांनीही आपल्या भाषणात आमदार देवेंद्र भुयार यांच्या कामाचे कौतुक केले. मोर्शीतील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी पोटतिडकीने पाठपुरावा केला असून त्यांच्यामुळेच अनेक विकासाची कामे मार्गी लागत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

महाविकास आघाडी सरकार कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी काम करत असताना केंद्र सरकारने मात्र शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले असल्याची टीका त्यांनी केली. "शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत येऊ नये यासाठी केंद्र सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. पाकिस्तानी, चिनी असल्यासारखी वागणूक शेतकऱ्यांना दिली जात आहे." 

केंद्र सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले की, "पुर्वी दिल्लीवर हल्ले व्हायचे. मराठेशाहीने देखील दिल्लीवर हल्ला केला होता. दिल्लीच्या बादशहाने देखील मराठ्यांच्या भीतीने अशीच तटबंदी लावली होती. त्याचप्रकारे मोदी सरकार आज शेतकऱ्यांना तशीच वागणूक देत आहे. अनेक शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडले तरी मोदी साहेब अजून जागे होत नाहीत. मी करेल तो कायदा बरोबर अशी पंतप्रधानांची भूमिका आहे.अशा एक कल्ली, हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आता अनेकजण लढा द्यायला लागले आहेत. भाजप तटबंदीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे, तितकी त्यांच्या विरोधात नाराजी वाढत आहे."

Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख