नागपूर पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादी नरमली, शिवसेना रुसली - Shivsena Unhappy over Congress in Graduate Constituency election in Nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादी नरमली, शिवसेना रुसली

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

आम्ही फक्त काँग्रेसच्या सतरंज्याच उचलायच्या काय, असा सवाल उपस्थित करून पदवीधर निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा कार्यकारिणीत ठराव करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने चोवीस तासाच्या आतच निर्णय बदलाला. दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसने एकाही पदाधिकाऱ्यांना साधे निमंत्रण दिले नसल्याने शिवसेना रुसली आहे.

नागपूर :  आम्ही फक्त काँग्रेसच्या सतरंज्याच उचलायच्या काय, असा सवाल उपस्थित करून पदवीधर निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा कार्यकारिणीत ठराव करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने चोवीस तासाच्या आतच निर्णय बदलाला. दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसने एकाही पदाधिकाऱ्यांना साधे निमंत्रण दिले नसल्याने शिवसेना रुसली आहे.

महाआघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन त्यांनी नाराजी दूर केली. आता त्यांना शिवसेनेचा रुसवा दूर करावा लागणार आहे. अन्यथा याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त पावणे दोन लाखांच्या घरात मतदार असल्याने काँग्रेसला धोका पत्करणे परवडणारे नाही. पदवीधर मतदारसंघ आजवर काँग्रेसला जिंकता आला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने वगळता शहरातील एकही पदाधिकारी उमेदवारी दाखल करताना काँग्रेससोबत नव्हता. शिवसेनेचे संपर्क प्रमुख तसेच आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनाही निमंत्रण देण्यात आले नव्हते असे समजते. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी काल आक्रमक भूमिका घेतली होती. उमेदवार उभा करण्याचा कार्यकारिणीत ठाराव केला होता. विधानसभेत आम्हाला विचारले जात नाही, महापालिकेचे आठदहा जागा देऊन बोळवण केली जाते. नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे राष्ट्रवादी मोठी नाही. आमचे घड्याळ चिन्ह घरोघरी पोहचावयाचे आहे, असे अहीरकर म्हणाले होते. शिवसेना मात्र कोणाच्याच अध्यात-मध्यात नव्हती. त्यांनी पदवीधरमध्ये काहीच भूमिका घेतली नव्हती.

आम्ही नाराज नाही. मात्र, आम्हाला उमेदवारी दाखल करण्यासाठी बोलवण्यात आले नव्हते, हेही तेवढेच खरे. वेळसुद्धा माहिती नव्हती. अभिजित वंजारी वा इतर कोणीही संपर्क साधला नाही. त्यामुळे आमचे पदाधिकरी उपस्थित नव्हते - प्रमोद मानमोडे, महानगर प्रमुख, शिवसेना

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख