'तो' क्वारंटाईन गार्ड अडीच महीन्यांपासून झोपतोय जंगलात  - Quarantine Duty Guard Sleeping in Jungle Since last Two and Half Monts | Politics Marathi News - Sarkarnama

'तो' क्वारंटाईन गार्ड अडीच महीन्यांपासून झोपतोय जंगलात 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 24 मे 2020

पोलिस मुख्यालयातील युवा पोलिस कर्मचारी सेटिंग करुन इच्छुक ठिकाणी ड्युटी करीत आहेत. मात्र आपली सेटिंग नसल्याने 'क्वॉरंटाईन गार्ड' ड्युटीवर लावण्यात येत आहे,असा आरोप व्हायरल व्हिडिओतून करण्यात आला आहे. 

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पोलिस मुख्यालयात भ्रष्टाचार बोकाळला असून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीला पोलिस कर्मचारी अक्षरक्षः कंटाळले आहेत. मात्र, शिस्तीचे खाते म्हणून अनेक कर्मचारी 'बुक्‍क्‍यांचा मार' सहन करीत ड्युटी करीत आहेत. पोलिस मुख्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याने सोशल मिडियाचा सहारा घेतला आहे. व्हिडीओतून पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबचा पर्दाफाश झाला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश शुक्‍ला असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांची पोलिस मुख्यालयात नेमणूक आहे. सतीश शुक्‍ला गत अडीच महिन्यांपासून क्वॉरंटाईन गार्ड ड्युटी करीत आहेत. त्याने मुख्यालयातील ड्युटी रायटरला अनेकदा ड्युटी बदलविण्याची विनंती केली. पण रायटरने ड्युटी बदलण्यास नकार दिला. त्यामुळे शुक्‍ला हा अडीच महिन्यांपासून घरी गेलेला नाही. तो पोलिस मुख्यालयाजवळील जंगलातच झोपत आहे. पोलिस मुख्यालयातील युवा पोलिस कर्मचारी सेटिंग करुन इच्छुक ठिकाणी ड्युटी करीत आहेत. मात्र आपली सेटिंग नसल्याने 'क्वॉरंटाईन गार्ड' ड्युटीवर लावण्यात येत आहे,असा आरोप व्हायरल व्हिडिओतून करण्यात आला आहे. 

आजारी रजेवरून लगेच हजर 

डॉ. के. व्यंकटेशम पोलिस आयुक्‍त असताना एक पोलिस अधिकारी पैसे घेऊन ड्युटी लावत असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी या प्रकरणाची गंभीर देखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. प्रकरण शेकणार असल्यामुळे तो अधिकारी थेट आजारी रजेवर गेला होता. मात्र, डॉ. वेंकटेशम यांची बदली होताच तो अधिकारी अगदी दहा दिवसांत मुख्यालयात हजर झाला होता, अशी चर्चा आहे. मुख्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यामुळे आता पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. 

गेल्या तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून व्हिडीओ व्हायरल करीत सुटीसाठी मुख्यालयातील आरपीआय रामनंद सिंग हे त्रस्त करीत असल्याची तक्रार मांडणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी यशोदा हिची सुटी मंजुर झाली आहे. तिच्यावर एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिला कर्मचाऱ्यानेही सिंग यांच्यावर आरोप केला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख