नाना पटोलेंचे राहुल गांधींसाठी `बर्थ डे` गिफ्ट तयार : भाजपमधील पाच बडे मोहरे टिपलेत - Nana Patole ready with birthday gift for Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

नाना पटोलेंचे राहुल गांधींसाठी `बर्थ डे` गिफ्ट तयार : भाजपमधील पाच बडे मोहरे टिपलेत

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 जून 2021

भाजपला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न 

मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस (Rahul Gandhi Birthday राजकीय धूमधडाक्यात साजरा करण्याचे ठरविले असून त्याची सुरवात आज अमरावती पासून झाली. गेल्या आठवड्यात अमरावतीच्या दौऱ्यात असताना नाना पटोलेंनी सध्या भाजपच्या पण काॅंग्रेसमध्ये आधी असलेल्या सुनील देशणुख यांचा पक्षप्रवेश निश्चित करून घेतला. (Sunil Deshmukh decides to leave BJP)

माजी मंत्री सुनील देशमुख यांचा येत्या 19 जून या राहुल गांधींच्या वाढदिवशी मुंबईत काॅंग्रेस प्रवेश होणार आहे. आणखी पाच नेते काॅंग्रेसमध्ये परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पटोेले यांनीही ये तो पहली झाॅंकी है, असे सांगत भाजपला आणखी धक्के देणार असल्याचे सूतोवाच केले. जशाला तसे उत्तर द्यायचे आहे, असेही त्यांनी यानिमित्ताने सांगितले. रोज एका नावाची घोषणा यानिमित्ताने होणार आहे. 

काॅंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा सुरू केली असून आणखी दोन दिवस या चर्चा राहणार आहेत. पाटील यांच्या उपस्थितीतच आणखी काही प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले. 

ही बातमी वाचा : सुनील देशमुख यांची भाजपला सोडचिठ्ठी

माजीमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात आता नव्या राजकीय समीकरणाची नांदी राहील, असे मानले जात आहे. एकीकडे डॉ. देशमुख यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याने भाजपमधील काही नेते नाखूश आहेत, तर दुसरीकडे काही नेते आनंदी झाले आहेत. काँग्रेसमध्येसुद्धा हीच स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात डॉ. देशमुख यांच्या या निर्णयाचे काय पडसाद अमरावतीच्या राजकारणात उमटतात, याची उत्सुकता ताणल्या गेली आहे.
आज सकाळी डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा होती. अखेर 19 जून हा प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत.

डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषविली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी अतिशय सक्षमपणे जबाबदारी पार पाडली. एनएसयूआयचे महासचिव, ऑल इंडिया यूथ काँग्रेसचे सहसचिव, विदर्भ सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष, एमएसईबीचे उपाध्यक्ष, राज्यमंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषविली. त्यामुळे त्यांचे पक्षात चांगलेच वजन आहे. त्यामुळे त्यांच्या परतण्याने आपल्या आसनाला धक्का लागेल काय, अशी भीती काँग्रेसच्या काही नेत्यांना असल्याची चर्चा आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख