MP Bhavana Gawli stands in last number in the Lok Sabha performance | Sarkarnama

खासदार भावना गवळी यांचा लोकसभेतील कामगिरीत शेवटचा क्रमांक

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 जून 2020

आपली कामगिरी इतकी खालावलेली का या प्रश्नावर गवळी यांनी बरीचे कारणे सांगितली. त्या म्हणाल्या की या संसदेचे दोनच अधिवेशने झाली आहेत. दुसऱ्या अधिवेशनानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मी गेली 25 वर्षे खासदार आहे. बाकीचे लोक बोलताहेत. जे महत्वाचे विषय आहेत, ते मी बोलतेच. संसदेत बोलणे आणि मतदारसंघात काम करणे यामध्ये खूप फरक आहे, अशी बाजू त्यांनी यावर मांडली.

पुणे : लोकसभा सभागृहातील उपस्थिती, प्रश्न विचारणे, विधेयके मांडणे आणि चर्चेत सहभागी होणे यात महिला खासदार सुप्रिया सुळे या राज्यात प्रथम आलेल्या असताना या निकषांच्या आधारे यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची कामगिरी राज्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. उपस्थिती आणि प्रश्न विचारण्याच्या निकषांत त्यांची कामगिरी खराब आहे. 

परिवर्तन या संस्थेने  केलेल्या या मूल्यांकनमध्ये केलेल्या भावना गवळी यांची ही कामगिरी नोंदविली गेली आहे. भावना गवळी यांची सभागृहामध्ये उपस्थिती २२.५ टक्के  राहिली आहे. त्यांनी एकूण सभागृहात तीन प्रश्न विचारले आहेत व सभागृहातील चर्चेत फक्त एक वेळा सहभागी झाल्या आहेत. या तुलनेत प्रथम क्रमांकावरील सुळे यांची कामगिरी पाहता त्यांनी तब्बल 212 प्रश्न विचारले. चार खासगी विधेयके मांडली. चर्चेतही सातत्याने सहभाग नोंदविला. त्या तुलनेत गवळी यांची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. इतर खासदारांच्या उपस्थितीचे सरासरी प्रमाण 77 टक्के आहे. त्या तुलनेत गवळी यांची उपस्थिती फारच कमी आहे.  

सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवरील प्रश्न विचारले. जम्मू काश्‍मीरसाठीचे कलम 370, तिहेरी तलाख, शेतीमालाचा हमी भाव, दोन्ही पालखी मार्गांचे काम पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा, राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे, राज्यात रेल्वेचे रखडलेले प्रकल्प, पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना न्याय मिळवून देणे, रोजगार निर्मिती, महिला सुरक्षिता, तृतीयपंथियांना हक्क आणि अधिकार, मुद्रा लोनमुळे वाढणारे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण आदींवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

आपली कामगिरी इतकी खालावलेली का या प्रश्नावर गवळी यांनी बरीचे कारणे सांगितली. त्या म्हणाल्या की या संसदेचे दोनच अधिवेशने झाली आहेत. दुसऱ्या अधिवेशनानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मी गेली 25 वर्षे खासदार आहे. बाकीचे लोक बोलताहेत. जे महत्वाचे विषय आहेत, ते मी बोलतेच. संसदेत बोलणे आणि मतदारसंघात काम करणे यामध्ये खूप फरक आहे, अशी बाजू त्यांनी यावर मांडली.

संसदेमध्ये बोलल्याने किती प्रश्‍न सुटतात, हा एक संशोधनाचा विषय आहे. काही लोकं तर फक्त कागद घेऊन वाचतच राहतात. हे संसदेत अपेक्षित नाही. नितीन गडकरींना मी प्रश्‍न केला होता. त्यांनी नॅशनल हायवेचे खुप प्रोजेक्‍ट केले. त्यासाठी वर्ल्ड बॅंक तुम्हाला पैसे देत नाही, लोन देत नाहीये. यावर तुमचा प्लान बी काय आहे, हा प्रश्‍न केला होता. आर्थिक संस्था कर्ज देत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षात हा विषय चर्चेला आला होता. एखाद्या सेशनमध्ये कमीजास्त होत असते. आपण पार्लमेंटमध्ये काय मांडतो, त्यापेक्षा मतदारसंघाला काय देतो, हे महत्वाचे आहे. बरेच लोक पार्लमेंटचे अवॉर्ड घेतात, जेव्हा की त्यांना मुद्यांवरही बोलता येत नाही. मी तक्‍या वर्षांत कधीच तो अवार्ड घेतला नाही. काही 80 टक्के खासदार कागदांवर लिहीलेला मजकूर वाचन करताना दिसतात. एका विशिष्ट नियमानुसारच वाचन करता येते. मात्र काही लोक कुठलीही बाब वाचन करुनच लोकसभेत मांडतात. पण लोकसभा अध्यक्ष अशा लोकांना हटकत नाहीत. एखाद दुसऱ्या सेशनमध्ये कमी बोलले म्हणजे खासदार ऍक्‍टीव नाही, असे होत नाही, असेही समर्थन त्यांनी केले. 

लोकसभेत महाराष्ट्रातून सर्वाधिक उपस्थिती
गोपाळ शेट्टी - भाजप - (मुंबई उत्तर) - 100 टक्के
मनोज कोटक- भाजप- (मुंबई उत्तर पूर्व) - 100 टक्के -
कपिल पाटील - भाजप- (भिवंडी) - 95 टक्के
सुनील मेंडे - भाजप - (भंडारा- गोंदीया) - 93.75 टक्के-
हेमंत गोडसे - शिवसेना - (नाशिक) - 93.75 टक्के
...................

सर्वाधिक चर्चेत सहभाग घेणारे महाराष्ट्रातील खासदार
सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस - (बारामती) – 97
राहुल शेवाळे - शिवसेना - (मुंबई दक्षिण मध्य)-53
डॉ. श्रीकांत शिंदे - शिवसेना - (कल्याण) –49
श्रीरंग बारणे - शिवसेना - (मावळ) – 48
विनायक राऊत - शिवसेना - (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) - 46

सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार

सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी कॉंग्रेस - (बारामती)  212
सुभाष भामरे - भाजप - (धुळे) – 202
डॉ. अमोल कोल्हे - राष्ट्रवादी कॉंग्रेस - (शिरूर) – 202
गजानन किर्तीकर - शिवसेना - (मुंबई उत्तर पश्चिम) – 195
श्रीरंग बारणे - शिवसेना - (मावळ) - 194

  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख