अनिल देशमुखांसाठी 29 जून ही महत्वाची तारीख : मोठ्या घडामोडींची शक्यता.... - Former Home Minister Anil Deshmukh was again summoned by the ED for questioning | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अनिल देशमुखांसाठी 29 जून ही महत्वाची तारीख : मोठ्या घडामोडींची शक्यता....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 28 जून 2021

पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून पुन्हा मंगळवारी (ता. २९ जून) चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशमुख मंगळवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शनिवारी (ता. २६ जून) देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, चौकशीचे मुद्दे कळल्यानंतरच उत्तरे देता येतील, अशी भूमिका घेत देशमुखांनी एकप्रकारे ईडीवर कुरघोडी केली होती. (Former Home Minister Anil Deshmukh was again summoned by the ED for questioning)

देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी (ता. २६ जून) अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली होती. त्यानंतर आज (ता. २८ जून) पुन्हा ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : बागल-जगताप संघर्ष टोकाला; सचिवाबाबतच्या बैठकीला काही संचालक दांडी मारणार?

देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. या कंपन्या फक्त कागदोपत्री असून पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीचे मालक असलेल्या जैन बंधूंचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 

देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याने एका व्यक्तीला ही रक्कम पाठवून ट्रस्टमध्ये भरण्यास सांगितल्याचा ईडीचा दावा आहे. बारमालकांकडून घेतलेली ४ कोटी ७० लाखांची रक्कम ती हीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

देशमुखांविरोधात तक्रार देणाऱ्यांचा जबाब ईडीने नोंदविला

मनी लाँडरिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार करणारे ॲड. तरुण परमार यांचा जबाब सोमवारी (ता. २८ जून) ईडीने नोंदवला. या वेळी त्यांनी काही कागदपत्रेही ईडी कार्यालयात सादर केली. या प्रकरणी ईडीने पुन्हा बोलवल्यास आपण उपस्थित राहून यंत्रणेला सहकार्य करू, असे परमार यांनी सांगितले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख