नारायण दाभाडकर यांनी बेड सोडला की नाही? माहिती अधिकारातून उलगडा

दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.
congress leader Sachin Sawant slams RSS and BJP over Narayan Dabhadkar death
congress leader Sachin Sawant slams RSS and BJP over Narayan Dabhadkar death

मुंबई : रुग्णालयात आलेल्या तरूणासाठी बेड उपलब्ध होत नसल्याचे पाहून नागपूरमधील 85 वर्षांच्या नारायण दाभाडकर यांनी आपला बेड सोडल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. पण दाभाडकर यांचे जावई व नातेवाईकांनीच त्यांना प्रकृती गंभीर असल्याने स्वत:हून घरी नेले होते, असे माहिती अधिकारातून समोर आलं आहे. नातेवाईकांनी रुग्णालयाला तसे लिहून दिल्याचे पत्र काँगेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. (congress leader Sachin Sawant slams RSS and BJP over Narayan Dabhadkar death)

दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यावरून काही संघविरोधी लोकांनी सोशल मीडियावर दाभाडकर यांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वाद सुरू झाला होता. या वादानंतर दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनीही याबाबत खुलासा केला होता. वडिलांची प्रकृती खालावल्याने 21 एप्रिलला त्यांना खूप प्रयत्नांनंतर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात बेड मिळाला. याचवेळी रुग्णालयाच्या कॅारीडॅारमध्ये गोंधळ सुरू होता. बेड मिळण्यासाठी रडण्याचा आवाज येत होता. त्यांच्या अडचणी पाहून वडिलांचं मन विरघळलं, असे आसावरी यांनी सांगितले होते.

संघाच्या प्रतिमा संवर्धनाचा आरोप

सावंत यांनी माहिती अधिकारात मिळालेले पत्र ट्विट केले आहे. 'स्व. नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूचा उपयोग संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी करण्याचा अश्लाघ्य प्रकार भाजपाने केला. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान व अनेक भाजप, संघाचे नेते सहभागी झाले. वस्तुस्थिती माहिती अधिकारात समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती व पेशंटची स्थिती गंभीर असल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता,' असं ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

'दाभाडकर यांनी स्वतः व त्यांच्या जावयाने 'Discharge against Medical Advice' अंतर्गत स्वतः च्या जबाबदारीवर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली. या पत्रात कोणत्याही तरुणाचा उल्लेख नाही. या माहिती नंतरही स्व. नारायण दाभाडकर यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर कमी होणार नाही. त्यांना राजकारणात ओढणे हे अयोग्य आहे. त्यांनी जरी असे पाऊल उचलले असते तरी त्याचा संघाशी संबंध जोडणे हे उचित नव्हते,' असंही सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. 

मी माझं आयुष्य जगलो आहे

'मी आज ना उद्या जाणार आहे. डॅाक्टर म्हणत आहेत की, माझी स्थिती नाजूक आहे. आपण घरी जायचं आणि हा बेड रिकामा करायचा. कुणाच्या तरी कामाला येईल.' त्यांना तो आवाज बघवत नव्हता. माझी बहीण व जावयांनी त्यांना खूप समजवलं. पण त्यांना ते पटत नव्हते. त्यांनी मग मला फोन करायला लावला. 'मला घरी घेऊन चल, मला बेड सोडायचा आहे. मी 85 वर्षांचा झालो आहे. मी माझं आयुष्य जगलो आहे,' असे वडील म्हणाल्यानंतर मला एक क्षण काहीच सुचले नाही, मी त्यांना काय बोलू. माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता, असे आसावरी यांनी सांगितलं होतं.

दीड दिवसातच घेतला जगाचा निरोप

डिस्चार्ज घेताना रुग्णालयात बेड का सोडतोय, याचे काहीच कारण तिथे सांगितले नाही. फक्त कुटूंबियांना सांगितले होते. तिथून मग रुग्णवाहिकेने त्यांना घरी आणले. पुढे दीड दिवस ते घरी राहिले आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी केलेल्या परोपकाराचे आम्हाला कुणालाही भांडवल करायचे नाही. त्यांच्या परोपकाराचे मोल नाही. ते कुणीही करू शकणार नाही. त्यांनी केलेला त्याग आमच्यासाठी आदर्श राहील. त्यांनी त्याचा कुठलाही उहापोह न करता या जगातून निघून गेले, अशी भावनाही आसावरी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com