नागपूरच्या आमदार निवासातील डाॅक्टरही कोरोनाच्या विळख्यात

आमदार निवासात रात्र पाळीला सेवा देणाऱ्या एका 40 वर्षीय डॉक्‍टरलाही कोरोना विषाणूची बाधा असल्याचे काल पुढे आले. यापूर्वीची बाधित डॉक्‍टरही नरेंद्रनगर येथील असल्याने नरेंद्रनगरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : उपराजधानीत शनिवारी एकाच दिवशी दोघे दगावले. तर 20 जणांना कोरोनाची लागण झाली. कालदेखील अकोल्यातील महिला मेयोत दगावली तर, आमदार निवास विलगीकरण कक्षात सेवा देणारा एक डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यासह 19 जणांना कोरोनाच्या विषाणूने विळख्यात घेतले आहे.

एम्स आणि मेयोतील प्रयोगशाळेतून हे अहवाल प्राप्त झाले. यामुळे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा 540 वर पोचला आहे. विशेष असे की, सतरंजीपुरा, मोमिनपुरा, गोळीबार चौक, नाईक तलाव, बांगलादेश हे सर्व परिसर मध्य नागपुरअंतर्गत येत असल्याने मध्य नागपूर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

पाच दिवसांपूर्वी नरेंद्रनगर येथील रहिवासी आणि आमदार निवास विलगीकरणात सेवा दिलेल्या महिला डॉक्‍टरला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर काल रविवारी आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात कार्यरत आणखी एका डॉक्‍टरला कोरोनाची लागण झाली. शहरात नंदनवन, सदर आणि लोकमान्यनगर या नवीन वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्येही भय पसरले आहे. दिवसभरात एम्स आणि मेयोतील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात शहरातील तांडापेठ येथील 2, सदर येथील 1, नाईक तलाव येथील 6, बांगलादेश येथील 6 , लोकमान्यनगरातील 6 तर गोळीबार चौकातील 3 अशा एकूण 19 बाधितांची नोंद नागपुरात झाली आहे. 

नरेंद्रनगरातील दुसरा डॉक्‍टर 

आमदार निवासात रात्र पाळीला सेवा देणाऱ्या एका 40 वर्षीय डॉक्‍टरलाही कोरोना विषाणूची बाधा असल्याचे काल पुढे आले. यापूर्वीची बाधित डॉक्‍टरही नरेंद्रनगर येथील असल्याने नरेंद्रनगरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय नंदनवन येथील रहिवासी तर आमदार निवासात दिवस पाळीत कार्यरत एका 43 वर्षीय आरोग्य कर्मचारीदेखील कोरोनाबाधित असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. या दोघांच्याही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात आलेले विलगीकरणातील 2 डॉक्‍टर, 2 डाटा एन्ट्री ऑपरेटरसह काही जणांचे नमुने घेण्यात आले. ते नमुने निगेटिव्ह आहेत. तर काहींचे नमुने आज तपासले जाणार आहेत. 

उपराजधानीत 68 टक्के कोरोनामुक्त 

उपराजधानीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत मेयो, मेडिकलमधून यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे, हे सुखद चित्र नागपूर शहरात दिसते. आजपर्यंत एकूण 540 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी मेडिकल, मेयो, एम्समध्ये यशस्वी उपचारातून 380 जण कोरोनामुक्त झाले. तर 11 जण आजपर्यंत दगावले आहेत. शहरात आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 68 टक्के आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com