Breaking मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यात पालकमंत्री विश्वजीत कदम अनुपस्थित - Bhandara Guardian Minister Absent in CM Tour | Politics Marathi News - Sarkarnama

Breaking मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यात पालकमंत्री विश्वजीत कदम अनुपस्थित

अतुल मेहेरे
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

महा विकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा विदर्भ दौरा होता. या दौऱ्यासाठी त्यांचे सकाळी येथे आगमन झाले. वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने उपस्थित रहावे, असा संकेत आहे. मात्र, विश्वजीत कदम मुख्यमंत्र्यांसोबत नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे. 

नागपूर : मुखमंत्री आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणाला त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान भंडाऱ्याचे पालकमंत्री व काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महा विकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा विदर्भ दौरा होता. या दौऱ्यासाठी त्यांचे सकाळी येथे आगमन झाले. वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने उपस्थित रहावे, असा संकेत आहे. मात्र, विश्वजीत कदम मुख्यमंत्र्यांसोबत नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे. 

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे. काँग्रेसने या नामकरणाच्या विरोधात भूमीका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत जाहीर वक्तव्य केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालविण्याचे ठरल्याचे त्यांनी शिवसेनेच्या लक्षात आणून दिले आहे. 

मध्यंतरी शिवसेना खासदार व 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेस नेतृत्त्वाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरुनही काँग्रेसमध्ये नाराजी आहे. विश्वजीत कदम यांच्या अनुपस्थितीमागे ही कारणे तर नाहीत ना, अशी शंका आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, महा विकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा विदर्भ दौरा होता यापूर्वी त्यांनी विदर्भात समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी दौरा केलेला होता त्यानंतर आज ते पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्‍यातील गोसेखुर्द धरणावर गेले. विदर्भ हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आणि तेवढाच महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गोसेखुर्द प्रकरणाचे काम गेल्या पस्तीस वर्षांपासून सुरू आहे पण अद्यापही ते पूर्णत्वास गेले नाही असा प्रश्न विचारला असता विदर्भातील रखडलेल्या सर्व प्रकल्प सर्व कामात यांची पाहणी करणं तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर पुढील काळात उपाययोजना करणार आहे, असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उमरेड विधानसभा मतदारसंघातील चाळीसगाव या प्रकल्पामध्ये गेलेली आहेत. पण अद्यापही त्या गावातील पुनर्वसनाची कामे पूर्ण झालेली नाहीत वीज पाणी आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप तेथे पोहोचलेल्या नाहीत असे उमरेड चे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले त्यावर श्री ठाकरे यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले आहे. तिचे सविस्तर चर्चा करून प्रकल्प पूर्ण करणे आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी आमदार राजू पारवे यांच्यासोबत बोलताना दिले.

मुख्यमंत्र्यांनी धरणाच्या दरवाजांची पाहणी केली.  त्यानंतर त्यांना क्रमांक दोनचे द्वार उघडून दाखवण्यात आले. दोन मिनिटांसाठी या जलाशयातून पाणी सोडण्यात आले. यानंतर शासकीय अधिकाऱ्यांची बैठक गोसीखुर्द प्रकल्पाच्या राजीव टेकडी या परिसरात झाली. त्यानंतर येथून ते राजीव टेकडी साठी रवाना झाले. त्यानंतर दुपारी ब्रह्मपुरी जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख