Appointment of teachers for corona survey | Sarkarnama

वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही शिक्षकांच्या हाती तापमापी! 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 21 मे 2020

अकोला महापालिका, जिल्हा परिषदेसह नगरपालिका व खासगी संस्थांच्या शिक्षकांची सेवा कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी घेण्यात आली आहे. कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण घेतले नसताना त्यांच्या हातात तापमापी सोपवून त्यांना  प्रवाशांची चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे.

अकोला ः अकोला महापालिका, जिल्हा परिषदेसह नगरपालिका व खासगी संस्थांच्या शिक्षकांची सेवा कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी घेण्यात आली आहे. कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण घेतले नसताना त्यांच्या हातात तापमापी सोपवून त्यांना जिल्हा व तालुका सीमांवर प्रवाशांची चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनंतर आता शिक्षकांच्या घरातही कोरोनाचा विषाणू पोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी आवश्‍यक असणारे साहित्य पुरेशा प्रमाणात डॉक्‍टर, परिचारिका, आरोग्य सेवक यांना उपलब्ध न झाल्याने काही डॉक्‍टर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करू लागले. कोणत्याही संरक्षण साहित्याशिवाय शिक्षक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या कामात गुंतले आहेत. 

नेहमीप्रमाणे कोणतेही काम आले की "आदर्श पेशा' म्हणून वाट्टेल ते काम करावे लागणारे शिक्षक आता कोरोना विषाणूच्या संकटातही सुटलेले नाहीत. जिल्हा परिषदेचे शिक्षक गावोगावी फिरून सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करीत आहेत. बहुतांश महानगरपालिकांच्या क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. अकोला मनपाच्या शिक्षकांनाही सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले आहे. 
 

शिक्षकांची नियुक्ती म्हणजे, अंधाऱ्या गुहेत वाघ शोधण्याचा प्रयत्न 

कोरोना विषाणू सर्वेक्षणाच्या कामासाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यापूर्वी निवडणूक, जनगणना वगैरे कामांसाठी शिक्षकांना घरोघरी फिरविले. डॉक्‍टर, परिचारिका, आशा सेविका यांना या कामाचा अनुभव असतो, पोलिसांकडे वर्दीचा धाक असतो. मात्र शिक्षकांकडे कर्णाची कवचकुंडलेच आली आहेत आणि त्यांना कोरोना स्पर्शही करू शकणार नाही, अशा भावनेतून शिक्षकांना हे काम देण्यात आले आहे. हे काम म्हणजे शिक्षकांसाठी अंधाऱ्या गुहेत वाघाचा शोध घेण्यासारखे असल्याची कुजबूज शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे 
 

शिक्षकांना संसर्ग झाला तर शिकविणार कोण? 

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी फिरावे लागत आहे. काहींची जिल्हा व तालुका सीमांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या काळात शिक्षक स्वतःच संक्रमित झाले तर त्यांनी आगामी शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शिकवावे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज जवळची ओळखीची माणसंसुद्धा बोलयचे टाळता येणार नाही म्हणून हातभर अंतर ठेवून बोलतात आणि सरकार शिक्षकांना घरोघरी फिरायला सांगत आहे. म्हणजे, बाहेर जा आणि कोरोना घरात घेऊन या, अशी भीती शिक्षकांना वाटू लागली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख