यवतमाळ जिल्हा बॅंकेसाठी आज मतदान; कुणाची होणार सरशी? - Yavatmal District Bank Election Today | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळ जिल्हा बॅंकेसाठी आज मतदान; कुणाची होणार सरशी?

चेतन देशमुख
सोमवार, 21 डिसेंबर 2020

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदांसाठी आज (ता. २१)  जिल्ह्यातील २९ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. एकूण १९ जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी शेतकरी सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदांसाठी आज (ता. २१)  जिल्ह्यातील २९ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. एकूण १९ जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी शेतकरी सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्हा गटासह अनेक तालुका गटांत अत्यंत चुरशीच्या लढती होणार आहेत. त्यासाठी रविवारी (ता.२०) दिवसभरात अनेक वेगवान घडामोडी घडल्या. त्यामुळे आता मतदान कशा पद्धतीने होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा कारभार गेल्या १३ वर्षांपासून एकाच संचालक मंडळांकडे आहे. कर्जवाटप, साहित्य खरेदी, नोकरभरती, विविध निविदा, भाड्याची वाहने आदी माध्यमांतून बॅंकेची वार्षिक उलाढाल एक हजार कोटी रुपयांच्या वर आहे. अशा बॅंकेवर आपली सत्ता यावी, यासाठी दोन्ही आघाड्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट सामना यावेळी होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी एक हजार १७५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुका गटांमध्ये मतदारांची संख्या सहाशे एवढी आहे, तर जिल्हा गटात ५७५ मतदार आहेत. जिल्हा गटामधील महिला, ओबीसी, व्हीजेएनटी, एससी-एसटी या राखीव जागांवार सर्व एक हजार १७५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विविध राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक आता रंगतदार वळणावर पोहोचलेली दिसून येत आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी मतदारांना 'टूर'देखील घडवून आणली आहे. 

त्यामुळे हे सर्व मतदार थेट मतदानासाठीच येणार असल्यात्यमुळे काही ठिकाणी गोंधळाची शक्‍यतादेखील नाकारता येत नाही. दरम्यान, या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेक मोठे फेरबदल या मतदानात होण्याची शक्‍यतादेखील नाकारता येत नाही.

अनेक दिग्गज आखाड्यात
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. उमेदवारी न मिळाल्याने सर्वच पक्षांत नाराज झालेल्या इच्छुकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका काहींना बसण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडीमधीलच काही जण अपक्ष किंवा दुसऱ्या पॅनेलकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने क्रॉस वोटिंग होण्याची जास्त शक्‍यता आहे. त्यामुळे ही निवडणूक अनेकांना तारणार असून, अनेकांना झटकाही देणारी ठरण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख