संचारबंदी, दुकानं बंद, फौजदारी गुन्हा : कोरोनासाठी सरकार झालं कठोर - Curfew, shops closed, criminal offenses: The government has become tough for Corona | Politics Marathi News - Sarkarnama

संचारबंदी, दुकानं बंद, फौजदारी गुन्हा : कोरोनासाठी सरकार झालं कठोर

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

कोरोना विषाणूचा संसर्ग एकिकडे देशात नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत असतानाच, महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणांपुढे एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे.

अमरावती :  कोरोना विषाणूचा संसर्ग एकिकडे देशात नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत असतानाच, महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणांपुढे एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्यामुळे नियंत्रणात आलेल्या परिस्थितीवर असणारी पकड अशीच ठेवण्यासाठी आता राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागल्या आहेत. असे असले तरीही अमरावती जिल्ह्यात मात्र नाईलाजास्तव संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अमरावती जिल्ह्यात हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले गेले असून, या आदेशांअंतर्गत सर्व दुकाने आणि सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत. केवळ गर्दीला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संचारबंदीचे आदेश लागू करुन सुद्धा गर्दी नियंत्रणात येत नल्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

कोरोना रोखण्यासाठी मुंबईच्या लोकमध्ये 'मार्शल्स' 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, प्रवाश्यांनी मास्क न वापरल्यास वाहतुकदाराला पाच हजार दंड. नियम न पाळणाऱ्या दुकानांना १० हजार दंड व फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तर, हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ १० पर्यंतच करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळल्यास २५ हजार दंड व १० दिवस हॉटेलला सील करण्याची सुचना करण्यात आली आहे. लग्नात अधिक उपस्थिती आढळल्यास हॉलचालकाला ५० हजार दंड व १० दिवस हॉलला सील व वधू- वर पक्षावरही फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये त्यासाठी कडक उपायोजना करण्यात आल्या आहेत. 

लाॅकडाऊन पाहिजे की, थोड्या निर्बंधासह मोकळेपणाने रहायचे जनतेने ठरवावे..
 

1 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र जमू नये. विद्यालय, महाविद्यालय - कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावेत असे सांगत धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्याचा निर्णय अमरावती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


//