यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमध्ये जानेवारीत खांदेपालट - Change of Guard in Ten Nagar Parishads of Yavatmal in January | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमध्ये जानेवारीत खांदेपालट

चेतन देशमुख
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यातील दहा नगरपालिकांतील विषय समित्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या जानेवारी २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, कोरोनाचे संकट आल्यापासून ऑफलाइन बैठका बंद आहेत. अशा परिस्थितीत जानेवारीत सभापतींच्या निवडीसाठी बैठकांना परवानगी मिळते की नाही व सभापतींच्या जागा रिक्त राहणार का, याबाबत संभ्रम आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपालिकांतील विषय समित्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या जानेवारी २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, कोरोनाचे संकट आल्यापासून ऑफलाइन बैठका बंद आहेत. अशा परिस्थितीत जानेवारीत सभापतींच्या निवडीसाठी बैठकांना परवानगी मिळते की नाही व सभापतींच्या जागा रिक्त राहणार का, याबाबत संभ्रम आहे.

जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, नगरपंचायती, ग्रामपंचायत यानंतर नगरपालिकांतील विषय समिती सभापतीची निवड होणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, वणी, घाटंजी, नेर, पांढरकवडा या दहा नगरपालिका आहेत. या ठिकाणी जानेवारी २०२१ मध्ये विद्यमान सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नवीन सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. 

मात्र, सध्या कोविड-१९मुळे बैठका घेणे बंद आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती आदी ठिकाणी कोणतीही ऑफलाइन बैठक झाली नाही. सभापतींची निवड करताना विशेष सभेचे आयोजन केले जाते. परंतु, कोरोनाच्या काळात बैठक होणार की नाही, याबाबत शक्‍यता कमीच आहे. दुसरीकडे २०२१ हे नगरपालिका निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे सभापतिपदावर आपली वर्णी लागावी, यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशास्थितीत आपल्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडावी, यासाठी नगरसेवकांकडून "फिल्डिंग'लावली जात आहे.

जिल्हा परिषदेतील पद रिक्त
जिल्हा परिषदेत विषय समिती सदस्य व स्थायी समिती सदस्यांची पदे रिक्त आहेत. कोविड-19 सुरू झाल्यापासून निवडीची विशेष सभा झालेली नाही. त्यामुळे नऊ महिन्यांपासून विषय समितीत जाण्यासाठी पंचायत समिती सभापती व स्थायी समितीत जाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य ताटकळत आहेत.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


पालिकानिहाय सभापतींची मुदत संपण्याची तारीख

यवतमाळ ९ जानेवारी
वणी ९ जानेवारी
दारव्हा १६ जानेवारी
दिग्रस १३ जानेवारी
पुसद १३ जानेवारी
उमरखेड १३ जानेवारी
आर्णी १३ जानेवारी
घाटंजी १३ जानेवारी
नेर १७ जानेवारी
पांढरकवडा २३ जानेवारी