चंद्रपूर : जीव मुठीत घेऊन कोरोनाच्या काळात सेवा दिली. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन नाही. हातातोंडाशी गाठ पडणे अवघड आहे. घरदार सोडून वादळ वारा झेलत डेरा टाकून आहोत. मागणी काय, तर आमच्या हक्काचे वेतन द्या. दोन महिन्यांत तुम्ही अनेकदा आमच्या समोरून गेला. साधी भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही. आता तुम्ही आम्हालाच झोडपण्याची भाषा करता. तुम्ही मदत व पुनर्वसन मंत्री आहात. जिल्ह्याचे पालक आहात. पालकमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही. कोरोना योद्धांचा हा अपमान आहे. वडेट्टीवार माफी मागा...असा संताप शेकडो आंदोलक महिलांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी पालकमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ‘डेरा’ आंदोलनावर बोलताना वडेट्टीवारांचा तोल सुटला. आंदोलनातील कामगार उठले नाही तर त्यांना झोडपून काढू, असा आदेश प्रशासनाचा दिल्याचे वक्तव्य वडेट्टीवारांनी केले. त्यांच्या या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले.
दरम्यान, वडेट्टीवारांच्या वक्तव्याची ऑडिओ क्लीप समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जनविकास संघटनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आंदोलनस्थळी पत्रकार परिषद बोलावली. या वेळी मोठ्या संख्येने आंदोलक महिला उपस्थित होत्या. त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. थकीत वेतनासाठी कोरोना योद्ध्यांना दोन महिन्यांपासून रस्त्यावर झोपावे लागत आहे. त्यांना हक्काचे वेतन द्यायचे नाही. उलट त्यांना झोडपून काढण्याची भाषा पालकमंत्री करीत आहे. महाविकास आघाडी सरकारचे कोरोना योद्धा, कामगार आणि महिलांबाबतचे हेच धोरण आहे काय? आंदोलनातील मागण्या चुकीच्या आहेत. हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान पालकमंत्र्यांना आंदोलकांनी या वेळी दिले.
नैराश्यातून पालकमंत्र्यांनी आंदोलकांवर राग काढला असावा
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजपर्यंत डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले, असे ते सांगतात. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय या सर्वांसोबत त्यांनी वारंवार बैठका घेतल्या. नियमानुसार तोडगा सुचवला तरीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नैराश्यातून पालकमंत्र्यांनी आपला राग आंदोलनकर्त्यांवर काढला असावा, असा टोला जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत लावला.
हा तर कोरोना योद्धयांचा अपमान
मागील दोन महिन्यांपासून थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या गोरगरीब महिला-पुरुष कामगारांची भेट घेण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. याकाळात ते अनेकदा चंद्रपुरात येऊन गेले. आंदोलकांना ओलांडून त्यांनी अनेक बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात घेतल्या. मात्र, थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या आंदोलकांकडे त्यांनी ढुंकूनही बघितले नाही. आता त्याच आंदोलकांना झोडपण्याची भाषा ते करीत आहे. हा कोरोना योद्धयांचा अपमान आहे. पालकमंत्र्यांनी आंदोलकांची माफी मागावी, असा संतप्त सूर आंदोलकांमध्ये होता.

