यवतमाळ : एखाद्या मंत्र्यांवर आरोप होत असेल; तर त्या मंत्र्यांनी स्वत:हून पुढे आले पाहिजे. आठ दिवस होऊनसुद्धा एवढ्या ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर फिरत असतानाही चौकशी होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे महिलांप्रती किती सजग आहे, स्त्रीयांचा किती आदर करणारे आहे, हे या घटनेवरून दिसून येते.
महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पूजा चव्हाण नामक युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. यापूर्वीही एका मंत्र्यांवर एक महिलेने आरोप केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार नसून हनीमून सरकार असल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी राज्यमंत्री मदन येरावार यांनी रविवारी (ता.14 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना केला.
पुण्यातील महंमदवाडी हडपसर येथील एका उच्चभ्रूंच्या सोसायटीच्या पहिल्या माळ्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. पुणे येथील युवतीच्या आत्महत्या प्रकरणी विरोधकांकडून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडित असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक "वार' सुरू आहेत.
या वादात माजी राज्यमंत्री तथा भाजपचे आमदार मदन येरावार यांनी उडी घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या बाराही क्लिपमध्ये संजय राठोड यांचा आवाज आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. राठोड, अरुण आणि पूजाचा मोबाईल पोलिसांनी जप्त करायला पाहिजे. संजय राठोड यांनी स्वतः समोर येऊन खुलासा करावा, असा सल्लाही येरावार यांनी दिला आहे.
बंजारा समाजातील एका नव्या जोमाच्या स्त्री नेतृत्वाचा अंत झाला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल चौकशीचे आदेश पोलिस प्रशासनाला द्यावेत, अशी मागणीही आमदार येरावार यांनी केली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिचा फोन, लॅपटॉप ताब्यात घेण्यासाठी का प्रयत्न करत होते? त्यात असे काय दडलेले आहे? याचा खुलासा झाला पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या ऑडिओ क्लिप ऐकल्या पाहिजेत. सुमारे 12 ऑडिओ क्लिपमधील संभाषणात राठोड यांचा आवाज स्पष्ट ओळखू येतो. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. आम्ही यासंदर्भात आंदोलनसुद्धा करणार आहोत, असा इशाराही मदन येरावार यांनी दिला आहे.
मंत्री संजय राठोड हे मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. त्यांचा आवाज माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व जनता ओळखते. जवळपास 12 क्लिप्स संपूर्ण समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यातील संभाषणातील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. आत्महत्या करण्यापूर्वी, आत्महत्येच्या दिवशी व आत्महत्येनंतरही पुरावे नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न हा संशयास्पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार मदन येरावार यांनी केली.

