राज्यातील १६० हवालदार झाले पीएसआय : आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा - Second Phase Police Promotions as Sub Inspector on Cards | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील १६० हवालदार झाले पीएसआय : आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा

अनिल कांबळे
गुरुवार, 11 मार्च 2021

खात्याअंतर्गत २०१३ साली घेण्यात आलेल्या पीएसआय अर्हता परीक्षेत पास झालेल्या राज्यातील आणखी १६० पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्‍नती देण्यात आली. पदोन्नतीच्या यादीमुळे उर्वरित पोलिस हवालदारांच्या पीएसआय अधिकारी होण्याच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत.

नागपूर : खात्याअंतर्गत २०१३ साली घेण्यात आलेल्या पीएसआय अर्हता परीक्षेत पास झालेल्या राज्यातील आणखी १६० पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्‍नती देण्यात आली. पदोन्नतीच्या यादीमुळे उर्वरित पोलिस हवालदारांच्या पीएसआय अधिकारी होण्याच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या २०१३ मध्ये पोलिस विभागाअंतर्गत पीएसआय पदासाठी परीक्षा घेण्यात आला होती. जवळपास ३ हजार उत्तीर्ण पोलिस हवालदारांना यापूर्वीच पदोन्नती देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या यादीत १६० हवालदारांना शासकीय कारणास्तव पदोन्नती राखीव ठेवण्यात आली होती. त्यात १३१ पोलिस हवालदार आणि २९ सहायक पोलिस निरीक्षकांना गृहखात्याने सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अधिकारी पदावर पदोन्नती दिली. यामध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे १०० पोलिस हवालदारांचा समावेश आहे. 

पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या पोलिस हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकांना १५ दिवसांचा इंडक्शन कोर्स बंधनकारक करण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालक ( प्रशिक्षण व खास पथके ) यांच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तत्पूर्वी, ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीने ज्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे,त्या ठिकाणी जाऊन पदभार स्वीकारावा आणि त्याचा अहवाल पाठवावा, असे आदेशही गृह विभागाने दिले आहेत. पदोन्नतीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी म्हणून काम करताना कामकाजाची माहिती व्हावी, या हेतूने १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्यक्षात पीएसआय झालेल्या अधिकाऱ्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण करावे लागते. परंतु यातील बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून कोरोनाचाही संसर्ग वाढू लागल्याने १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मेरा नंबर कब आयेगा !
सेवाज्येष्ठता यादी अद्याप लागलेली नाही. त्यामुळे कुणाचा नंबर कुठे आहे ? याबाबत अनेक जण संभ्रमात आहेत. तत्कालीन गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांनी गांभीर्य न दाखवल्यामुळे सेवाज्येष्ठता यादी लागली नाही. त्यामुळे अनेक पोलिस हवालदार निराश झाले आहेत.

आता गृहमंत्र्यांकडून अपेक्षा
गेल्या सात वर्षांपासून हा हवालदारांच्या पदोन्नतीचा प्रश्‍न प्रलंबित होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृह खाते घेताच पदोन्नतीच्या प्रश्‍नाला प्राधान्य दिले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताटकळत ठेवलेला हवालदारांचा विषय देशमुख यांनी निकाली काढत पदोन्‍नती दिली आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांकडून पोलिस हवालदारांना पदोन्नतीची अपेक्षा आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख