तुकाराम मुंढेंना समर्थन देणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल - Nagpur Police Filed Cases Against Tukaram Mundhe Supporters | Politics Marathi News - Sarkarnama

तुकाराम मुंढेंना समर्थन देणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना निरोप देतेवेळी घोषणाबाजी व रस्ता अडविल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मुंढे समर्थक व नगरसेवक कमलेश चौधरी, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्यासह तब्बल १२५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत

नागपूर : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना निरोप देतेवेळी घोषणाबाजी व रस्ता अडविल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मुंढे समर्थक व नगरसेवक कमलेश चौधरी, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्यासह तब्बल १२५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

मुंढे यांची बदली झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी ते नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी आर्य, चौधरी यांच्यासह शेकडो समर्थक सिव्हिल लाइन्समधील मुंढे यांच्या तपस्या निवासस्थानासमोर जमले. यावेळी समर्थकांनी हातात फलक झळकावून घोषणा दिल्या. तसेच रस्ता अडवून वाहतुकीला अडथडा निर्माण केला. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे भानही समर्थकांनी ठेवले नाही. एवढेच नव्हे तर काही समर्थकांनी पोलिसांशी वादही घातला. या समर्थकांविरुद्ध पोलिसांची परवानगी न घेता जमाव जमविणे, घोषणा देणे, रस्ता अडविणे, नियमांचा भंग करणे, पोलिसांशी वाद घालण्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

महापालिका आयुक्त म्हणून कोरोनावर नियंत्रणाच्या प्रयत्नात असताना राज्य सरकारने २६ ऑगस्ट रोजी त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी बदली केली. अचानक बदली झाल्याने त्यांना तसेच नागपूरकरांनाही धक्का बसला होता. तत्पूर्वी २४ ऑगस्टला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते नागपुरातच होते. नुकताच त्यांनी पुन्हा चाचणी केल्यानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. आता तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी केलेली बदली पण रद्द करण्यात आली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख