महिला वनपरिक्षेत्र अधिकारी 'लेडी सिंघम' दिपाली चव्हाण यांची आत्महत्या - Melghat Women Forest Officer Deepali Chavan suicide  | Politics Marathi News - Sarkarnama

महिला वनपरिक्षेत्र अधिकारी 'लेडी सिंघम' दिपाली चव्हाण यांची आत्महत्या

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोट वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार यांचे नाव असल्याचे समजते.

मेळघाट : रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्‍या आणि 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. गेल्या महिन्यात पोलिस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटना उघड झाल्यानंतर तब्बल दीड तास कोणालाच घरात प्रवेश करु देण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरु होती. दिपाली यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शासकीय बंदुकीतल्या गोळ्या स्वतःच्या छातीवर मारून घेतल्या, अशी माहिती आहे. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज त्यांच्या परिचितांनी वर्तविला आहे. 

एका माहितीप्रमाणे, दिपालीला एक वरिष्ठ  वनअधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपालीला त्यांनी खडसावल्याची माहिती आहे. दिपाली यांनी सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. त्यात काय लिहिले ते समजू शकलेले नाही. घटना घडली त्यावेळी त्यांच्या घरी कोणीच नव्हते, असे समजले आहे. दिपाली यांनी धुळघाट रेल्वे येथे असताना सालई डिंक तस्करांना नामोहरम केले होते. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालुर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. सोमवारीच दिपाली यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार पटेल तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे पोचहलेले होते. पोलिस तपास सुरू आहे.

दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोट वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार यांचे नाव असल्याचे समजते. त्यांना पाठीशी घालणारे क्षेत्र संचालक रेड्डी आणि शिवकुमार यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (वनमंत्री) तत्काळ कारवाई करणार का ? अशी मागणी करण्यात येत आहे.

दिपाली चव्हाण या या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत २०१५ मध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या मुळच्या मराठवाड्यातील रहिवासी होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. एक कर्तव्यकुशल व तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख