एक वर्षापूर्वी मंजूर झालेला निधी परत जाण्यापासून विखे-पवार रोखतील का - Will Vikhe-Pawar stop the return of funds sanctioned a year ago? | Politics Marathi News - Sarkarnama

एक वर्षापूर्वी मंजूर झालेला निधी परत जाण्यापासून विखे-पवार रोखतील का

आशिष निंबोरे
शुक्रवार, 9 जुलै 2021

महत्त्वाकांक्षी सौरऊर्जा प्रकल्प, गावांतर्गत रस्ते, कापूस जिनिंग, धान्यसाठवण गोदाम, व्यापारी संकुल, शाळा वर्गखोल्या व डिजिटल वर्ग यासाठी मिरजगावसह कोकणगाव आणि रातंजन या गावांना १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मिरजगाव, ता. ९ : राष्ट्रीय रूरर्बन अभियानांतर्गत मिरजगाव गाव समूहास मजूर झालेला १५ कोटी रुपयांचा निधी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या नियोजन व समन्वयाअभावी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हा निधी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार रोखतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Will Vikhe-Pawar stop the return of funds sanctioned a year ago?)

महत्त्वाकांक्षी सौरऊर्जा प्रकल्प, गावांतर्गत रस्ते, कापूस जिनिंग, धान्यसाठवण गोदाम, व्यापारी संकुल, शाळा वर्गखोल्या व डिजिटल वर्ग यासाठी मिरजगावसह कोकणगाव आणि रातंजन या गावांना १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी चार कोटी ५० लाख रुपये एका वर्षापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे जमा झालेले आहेत, असे असतानादेखील यातील बहुतांश कामे लाल फितीच्या कारभारात रखडली आहेत.

एकीकडे कामांसाठी निधी मंजूर असताना दुसरीकडे वर्ष उलटले तरी प्रकल्पासाठी जागा निश्चिती झालेले दिसत नाही. योजनेतील कामांच्या पूर्ततेसंदर्भात खासदार सुजय विखे आणि आमदार रोहित पवार दोघेही आग्रही आहेत.

या कामांमुळे मिरजगाव सारख्या ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो, ही धारणा दोघांचीही आहे. परंतु, कामाच्या प्राधान्य क्रमाबाबत दोघांची मते विभिन्न असल्याचे चित्र आहे. त्यातच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल देखील अनेक तक्रारी समोर येत आहेत. मंजूर कामांचे अंदाजपत्रक आणि नकाशे स्थानिक लोक प्रतिनिधींना मिळत नाहीत. त्यामुळे जी काही थोडीफार कामे सुरु झाली आहेत. त्यांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे शक्य होत नाही, अशी लोकप्रतिनिधींची तक्रार आहेत.

सुजय विखे आणि रोहित पवार वारंवार या कामांबाबत आढावा बैठक घेत आहेत. रखडलेल्या कामांबाबत वेळोवेळी नाराजी करूनही कामांना सुरवात होताना दिसत नाही.

कामे लवकरच पूर्ण होतील ः विखे पाटील

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या या महत्वाकांक्षी अभियानात येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. विविध प्रशासकीय मान्यता घेऊन कामे पूर्ण केली जातील. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी समन्वय साधत कामे करून घ्यावीत."- सुजय विखे, खासदार

कामांची योग्य सांगड आवश्यक ः आमदार पवार

या अभियानातील कामांची इतर योजनांमधील कामांशी योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. कामांची सुरवात होण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला असून आगामी काळात यातील बहुतांशी कामे लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी स्थानिक राजकारण बाजूला ठेऊन काम
करणे अपेक्षित आहे."- रोहित पवार, आमदार

हेही वाचा..

शिवसेनेचे औटी यांनी कोणाची वाट केली मोकळी

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख