मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, विधानसभा लढणार : घनःश्याम शेलार - Will remain in NCP till death, will fight for Assembly: Ghanshyam Shelar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, विधानसभा लढणार : घनःश्याम शेलार

संजय आ. काटे
रविवार, 25 एप्रिल 2021

आता यापुढे मरेपर्यंत पवार साहेब व अजित दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतच राहणार असून, आगामी विधानसभा ही घड्याळाच्या चिन्हावरच लढणार आहे.

श्रीगोंदे : 1999 ला भाजप सोडताना वेदना झाल्या होत्या. तालुक्‍यात पण हा पक्ष वाढविला होता. मात्र पवार साहेबांचा हात पाठीवर पडला व खरा आधार मिळाला. मध्यंतरी राष्ट्रवादी सोडण्याचा काळाकुट्ट दिवसही आला. तो माझ्यासाठी अडचणीचा काल ठरला. आता यापुढे मरेपर्यंत पवार साहेब व अजित दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतच राहणार असून, आगामी विधानसभा ही घड्याळाच्या चिन्हावरच लढणार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार यांनी मांडली.

शेलार म्हणाले, की सामान्य जनतेने माझ्यावर जीवापाड प्रेम केले. माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला मानाचे स्थान माझ्या पक्षातील नेत्यांनी मिळवून दिले. कारखाना, संस्था उभारु शकलो नसलो, तरी आजही सामान्य माझ्याशीच जास्त कनेक्‍टेड आहेत. याचा अभिमान आहे. काही संधी मिळाल्या मात्र ठराविक नेत्यांनी गलिच्च राजकारणाने त्या साकार होवू दिल्या नाहीत. आता सामान्यांची राहिलेली स्वप्ने पूर्णत्वास नेण्यासाठी आगामी विधानसभा शेवटची निवडणूक म्हणून लढणार आहे.

शेलार यांचा रविवारी (ता. 25) वाढदिवस आहे. त्यानिमित्त बोलताना ते म्हणाले, की गेली पस्तीस वर्षे झाली श्रीगोंद्यातील सामान्य माणसाच्या लढाईत सक्रिय आहे. सुरवातीला युवकांची संघटना केली. 1995 ला पहिली विधानसभा लढलो. पराभव झाला. मात्र कुकडीचे पाणी श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना मिळाले, यासाठी उभा केलेल्या संघर्षाला यश आले. तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे व जलसंपदामंत्री महादेव शिवणकर यांच्या माध्यमातून तालुक्‍यात पाणी आणले याचा अभिमान आहे. 

त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी आधार दिला व माझे सोने झाले. साध्या कार्यकर्त्याला एसटी महामंडळाचे संचालक केले. त्यामुळे शहरातील बसस्थानक व व्यापारी संकुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. कुठलाही कारखान नाही मात्र नेत्यांच्या आशिर्वादाने राज्य साखर संघावर जाणारा एकमेव संचालक आहे. गेली विधानसभेला कुणी तयार नसताना आपण राष्ट्रवादीकडून लढलो. नेत्यांचा विश्वास व जनतेच्या प्रेमावर जिंकणार असे वाटत असतानाच तालुक्‍यासह जिल्ह्यातील काही नेत्यांनी एकत्रीत येत आपला निसटता पराभव केला. 

मतदारसंघातील जनता आपल्या सोबत राहिली. समोर धनशक्ती असतानाही 99 हजार मते दिली. हे उपकार आता फेडायचे आहेत. त्यासाठी नवी उभारी घेत याच सामान्यांच्या जीवावर राहिलेली मतदारसंघाची स्वप्ने साकार करण्यासाठी शेवटची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. माझ्या पक्षातील सगळेच नेते सोबत आहेत. जनताही यावेळी आपल्यालाच सोबत करुन सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची किमया साधतील अशी अपेक्षा आहे. 

कुकडीचे पाणी आणणारा मीच आहे व त्याच पाण्याचे योग्य नियोजन करुन तालुक्‍याला न्याय देण्यासाठी माणिकडोह-डिंबे धरणाचा बोगदा आपणच करु शकतो, हा विश्वास आहे. साकळाई उपसा योजनेचा आपणच जन्मदाता असून तेही काम आपल्याच आमदारकीत मार्गी लागावे ही जनतेची इच्छा असल्याचेही शेलार म्हणाले. 
 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख