बुऱ्हाणनगर योजनेतून चोरून पाणी कोणी वापरले? : मंत्री तनपुरे यांचा कर्डिलेंवर आरोप - Who stole water from Burhannagar scheme? : Tanpure | Politics Marathi News - Sarkarnama

बुऱ्हाणनगर योजनेतून चोरून पाणी कोणी वापरले? : मंत्री तनपुरे यांचा कर्डिलेंवर आरोप

विलास कुलकर्णी
शनिवार, 27 मार्च 2021

बुऱ्हाणनगर पाणीयोजनेतून स्वतःच्या शेतीला चोरून पाणी कोणी वापरले, याची त्यांनी गावात चौकशी करावी. नंतर पाणीयोजनांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा द्यावा.

राहुरी : "राहुरी विधानसभा मतदारसंघातील मिरी-तिसगाव (ता. पाथर्डी) प्रादेशिक पाणीयोजनेचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याचा आदेश दिला आहे. याप्रश्नी अक्षय कर्डिले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याची मला माहिती नाही.

बुऱ्हाणनगर पाणीयोजनेतून स्वतःच्या शेतीला चोरून पाणी कोणी वापरले, याची त्यांनी गावात चौकशी करावी. नंतर पाणीयोजनांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा द्यावा,'' असा टोला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला.  

सरकारनामाशी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, "मतदारसंघातील सर्वांत मोठ्या बुऱ्हाणनगर पाणीयोजनेचा आढावा घेतला. त्यावेळी वीजबिलाची थकीत काही रक्कम भरून योजनेचा वीजपुरवठा सुरू करण्याचा आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. नंतर पाथर्डी दौऱ्यात मिरी-तिसगाव योजनेचा आढावा घ्यायचा होता; परंतु अचानक राहुरी तालुक्‍यात गारपीट झालेल्या भागाचा दौरा केला. त्यामुळे मिरी- तिसगावचा विषय मागे राहिला. दोन दिवस मुंबईला जावे लागले. मात्र, तालुक्‍यातील पाणीयोजनांकडे बारीक लक्ष होते.'' 

"मिरी-तिसगाव योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांच्या संपर्कात होतो. वीजबिलाची किती थकबाकी भरली जाईल, याची माहिती घेऊन योजनेचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. कुरणवाडी (ता. राहुरी) पाणीयोजनेचा वीजपुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने योजनेचे अध्यक्ष सुयोग नालकर व भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांच्याही संपर्कात होतो. मतदारसंघातील सर्व पाणीयोजनांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी माझे बारकाईने लक्ष राहिले,'' असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. 

 

हेही वाचा..

गांधी यांच्या अंत्यसंस्काराची चौकशी करणार

नगर : तीनदा खासदार, राज्यमंत्री असलेले स्व. दिलीप गांधी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

राज्यमंत्री तनपुरे यांनी गांधी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. ऍड. अभिषेक भगत यांनी स्व. दिलीप गांधी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याकडे मंत्री तनपुरे यांचे लक्ष वेधले. त्यावर तनपुरे म्हणाले, याबाबत आपण चौकशी करणार आहोत. 

तनपुरे यांनी सुवेंद्र गांधी यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, रोहिदास कर्डिले, अंबादास गारुडकर उपस्थित होते. 

माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही गांधी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी शहराध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख