राष्ट्रीय महामार्ग मंजुरीचे श्रेय नेमके कोणाचे? रोहित पवार की राम शिंदे - Who exactly is responsible for the approval of National Highways? Rohit Pawar's Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रीय महामार्ग मंजुरीचे श्रेय नेमके कोणाचे? रोहित पवार की राम शिंदे

आशिष निंभोरे
बुधवार, 7 एप्रिल 2021

"आमचा नेता लय पावरफुल... कर्जत-जामखेडमध्ये नवे पर्व" अशा मथळ्यासह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा फोटो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रसारित करत आहेत.

मिरजगाव : श्रीगोंदा-कर्जत-जामखेड या तालुक्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग 548 (ड ) मधील आढळगाव ते जामखेड या महामार्गासाठी भरीव निधी तसेच नगर-सोलापूर महामार्गाचे काम सुरु करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच घोषणा केली.

या घोषणांमुळे एकीकडे गेली अनेक वर्ष या महामार्गावरील खड्यातून जीव मुठीत घालत प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला, मात्र त्याच वेळी सोशल मिडियामधून भाजपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादाचे ऑनलाईन वाकयुद्ध पहायला मिळत आहे. महामार्ग होण्यासाठी आमच्याच नेत्यांनी कसा प्रयत्न केला आणि आमचाच नेता कसा पावरफुल आहे, हे सांगण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समाज माध्यमांचा वापर करताना दिसत आहेत.

"आमचा नेता लय पावरफुल... कर्जत-जामखेडमध्ये नवे पर्व" अशा मथळ्यासह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा फोटो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रसारित करत आहेत.

 "करून दाखवलंच... फक्त शिंदे साहेबच" असे म्हणत भाजप कार्यकर्ते गडकरींचे टवीट प्रसारित करत आहेत. तालुक्यातील बऱ्याच व्हॉट्सअॅप ग्रुप वर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमधील वाद विवाद पहावयास मिळत आहेत.

दोन्ही पक्षातील नेतेमंडळी मात्र सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठपुराव्यानंतर या महामार्गांच्या कामाचा मुहूर्त लागल्याचे बोलत आहेत. सामान्य नागरिक मात्र कार्यकर्त्यांमध्ये सुरु असलेल्या या ऑनलाईन दंगलीची मजा घेत चांगल्या दर्ज्याच्या विकास कामांची अपेक्षा दोन्ही पक्षांकडून करत आहेत.

केंद्राकडे आम्हीच पाठपुरावा केला ः पवार

"हे महामार्ग दोन्ही तालुक्यांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून,केंद्र सरकारकडे या बाबत सातत्याने पाठपुरावा केला. आगामी काळात या रस्त्यांचे काम दर्जेदार होण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले जाईल. मतदार संघातील विकासकामांना गती दिली जाईल," असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

आमच्या पाठपुराव्यामुळेच निधी ः शिंदे

"मागील अनेक वर्षापसून केंद्रशासन रस्ते सुधारणांचे महत्वाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या या दोन्ही महामार्गांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनेते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख