सरकारमध्ये नसताना ते बांधावर गेले, आता का घरात घुसले ! खोत यांनी साधला ठाकरेंवर निषाणा

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी कोरोनाच्या नावाखाली घरात बसून कारभार करीत आहेत. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.
Kohot-hajare.jpg
Kohot-hajare.jpg

राळेगणसिद्धी : ‘‘सरकारमध्ये नसताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी करणारे मुख्यमंत्री आता सत्तेत आहेत. मात्र ते शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी कोरोनाच्या नावाखाली घरात बसून कारभार करीत आहेत. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. कोरोनाची परिस्थिती हाताळतानाही राज्य सरकारला अपयश आले आहे,’’ अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

खोत यांनी राळेगणसिद्धी येथे रविवारी हजारे यांची भेट घेत त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या वेळी पीक कर्ज, शेतीमाल व दूध दर, सहकार चळवळ या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नी राज्य सरकारकडे हजारे यांनी पाठपुरावा करण्याची विनंती खोत यांनी हजारे यांना केली. पुढील चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र व विदर्भाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खोत म्हणाले, की खासगी दूध संकलन वाढले असून, शेतकऱ्यांच्या दुधाला अत्यंत कमी दर मिळत आहे. खासगी संस्थांमागे सत्ताधाऱ्यांचे मोठे रॅकेट आहे. उसाप्रमाणे दुधाला एफआरपी दर मिळण्याची गरज आहे.’’ दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्यासोबत २५ जून रोजी बैठक आहे. दुधाला एफआरपीप्रमाणे योग्य दर मिळण्याची मागणी आपण बैठकीत करणार आहोत, असे खोत म्हणाले.

दुधाला भाव मिळत नाही. शेतीमालाचे भाव व विक्रीचे प्रश्‍न आहेत. कोरोना व नैसर्गिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे अर्थिक गणितच बिघडले असताना राज्य व केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

या वेळी राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, आदिनाथ कपाले, गणेश साळुंके, हजारे यांचे स्वीय सहायक संजय पठाडे, श्‍याम पठाडे, अन्सार शेख, गणेश भापकर आदी उपस्थित होते.

कोरोना संकटाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज, खते, बी-बियाणे मिळत नाहीत. मोर्चे, उपोषणे कोणी करू नका, असे सांगणाऱ्या राज्य सरकारलाच खऱ्या अर्थाने कोरोना झालाय. महाविकास आघाडीतील पक्षांची जनहितासाठी नाही तर सत्तेतून पक्षवाढ व अर्थिक संचय करण्याची स्पर्धा लागली आहे, असे खोत म्हणाले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com