भाजपमध्ये काय घडतेय ! पाथर्डी-शेवगावमध्ये कार्यकर्त्यांत या कारणामुळे अस्वस्थता - What is happening in BJP! Unrest among activists in Pathardi-Shevgaon due to this | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमध्ये काय घडतेय ! पाथर्डी-शेवगावमध्ये कार्यकर्त्यांत या कारणामुळे अस्वस्थता

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात खलबते सुरू झाली आहेत.

नगर : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना मावशीचे प्रेम दिलेल्या पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मुंडे यांच्या कन्या असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांना पक्षाने मंत्रीपद दिले नाही. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचीही पक्षाने नाराजी केली, अशा भावनेने हे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजीनामा नाट्य सुरू झाले आहे. (What is happening in BJP! Unrest among activists in Pathardi-Shevgaon due to this)

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात खलबते सुरू झाली आहेत. काल पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, धनंजय बडे यांच्यासह पंचवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

काय म्हणतात पदाधिकारी

भाजपच्या प्रदेश व केंद्रातील नेतृत्वाने मुंडे यांना डावलल्याने आम्ही नाराज अहोत. आमची नाराजी राजीनाम्याच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करीत आहोत. पक्षनेतृत्वापर्यंत आमच्या भावना पोहचवा, अशी मागणी या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे.

कार्यकर्त्यांची भावना वरिष्ठांना कळविणार

पाथर्डी व शेवगावातील पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. पंकजा मुंडे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाला याबाबत कळविणार आहे, असे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी सांगितले.

 

शेवगावमधून राजीनामे

कट्टर मुंडेसमर्थक भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस, दिव्यांग विकास आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष व लाडजळगाव (ता. शेवगाव) ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामा देत असल्याचे कळवले आहे.

लाडजळगाव (ता. शेवगाव) येथील रहिवासी असलेले अंबादास बाबासाहेब ढाकणे हे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कारभार सांभाळत आहेत. तर हातगाव (ता. शेवगाव) येथील प्रशांत कारभारी ढाकणे हे भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत. तसेच लाडजळगाव ग्रामपंचायतीमध्ये कालिदास देवीदास ढाकणे हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. या तीनही पदाधिकाऱ्यांनी सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांना संधी देण्यात आली नाही. तसेच पंकजा मुंडे व खासदार डाॅ. प्रीतम मुंडे या मुंडे भगिनींना पक्षाकडून वारंवार डावलण्यात येत असल्याने एक कट्टर मुंडेसमर्थक या नात्याने आपल्या पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

 

 

हेही वाचा..

खासदार विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख