तुमच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला काय फायदा? विखे पाटलांचा थोरातांवर पलटवार - What is the benefit of your ministry to the district? Vikhe Patil's retaliation against Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

तुमच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला काय फायदा? विखे पाटलांचा थोरातांवर पलटवार

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 13 एप्रिल 2021

टास्क फोर्सने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे "लॉकडाउन'चे समर्थन करता येणार नाही. मदतीचे "पॅकेज' दिल्याशिवाय "लॉकडाउन' करणे चुकीचे होईल.

शिर्डी : "मुख्यमंत्री व मंत्री फक्त शहरी भागाची काळजी करतात. कोविड काळात त्यांनी ग्रामीण भागाला वाऱ्यावर सोडले आहे. नियतीने दिलेली विरोधी पक्षाची भूमिका आम्ही समर्थपणे पार पाडतो आहोत. तुम्हाला नियतीने मंत्रिपद दिले, त्याचा राज्याला किंवा नगर जिल्ह्याला काय फायदा झाला,'' असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपस्थित केला. 

कोविड नियंत्रण आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्‍चंद्र कोते, कैलास कोते, अभय शेळके, नितीन कोते, मंगेश त्रिभुवन उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""टास्क फोर्सने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे "लॉकडाउन'चे समर्थन करता येणार नाही. मदतीचे "पॅकेज' दिल्याशिवाय "लॉकडाउन' करणे चुकीचे होईल. सरकारच्या उदासीनतेमुळे रुग्णांना बेड, ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाही. सरसकट लॉकडाउनमुळे ग्रामीण भागाचे मोठे नुकसान होईल. सलून व्यावसायिकाची आत्महत्या हे त्याचेच उदाहरण आहे. हे सरकार फक्त शहरातील जनतेचे प्रतिनिधित्व करते. ग्रामीण भागातील बारा बलुतेदार संकटात आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही.'' 

संस्थांच्या रुग्णालयाने मदत करावी

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात सहकारी संस्था व मोठी रुग्णालये आहेत. तेथेच कोविड रुग्णालये सुरू करावीत. जिल्ह्यातील रुग्ण येथे आले, तर येथील यंत्रणेवरही ताण पडेल, तसेच संसर्गाचा वेगाने फैलाव होईल, असे मत शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केले.

 

हेही वाचा...

गमनेरात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड 

संगमनेर : आठवडाभर लागू केलेले निर्बंध व शनिवार- रविवारच्या "वीकेंड लॉकडाउन'नंतर आज नागरिकांची बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे, सायंकाळी उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता, शासनाने शनिवारी व रविवारी "वीकेंड "लॉकडाउन' घोषित केला होता. सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध घालून जीवनावश्‍यक वस्तू व रुग्णालये, औषधालये वगळता इतर आस्थापना बंद केल्या होत्या. आठवडाभर निर्बंध व "वीकेंड लॉकडाउन'नंतर नागरिकांनी आज शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील भाजीबाजारात व्यापारी, शेतकरी व ग्राहकांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. शहरातील रस्तेही दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गर्दीने फुलले होते. 

पुढे काही काळ "लॉकडाउन' लागू होण्याच्या भीतीने आज किराणा, धान्य, कृषी साहित्य, औषधे घेण्यासाठी गर्दी झाली होती. खरेदी करताना नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सचा पूर्ण विसर पडला होता. त्यामुळे आठवडाभर निर्बंध पाळूनही आजच्या गर्दीने त्यावर पाणी फेरल्याची चर्चा होती. 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख