विखे पाटलांचा मतदारसंघ कोरोनामुक्तीच्या मार्गावर - Vikhe Patil's constituency on the way to coronation | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटलांचा मतदारसंघ कोरोनामुक्तीच्या मार्गावर

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 3 जून 2021

खासगी कोविड सेंटर ओस पडलीत. लाट भरात असताना रोज तीनशेहून अधिक बाधित असायचे. काल पंधराशे चाचण्या झाल्या; बाधित होते केवळ 64. सोळा गावांत एकही नवा रुग्ण नव्हता.

शिर्डी : कोविड (Corona) प्रकोपाचा तीन महिन्यांचा काळाकुट्ट काळ इतिहासजमा होतोय. परिचितांच्या मृत्यूच्या बातम्याही आता कमी होऊ लागल्या आहेत. राहाता तालुक्‍यातील 75 टक्के गावांतून कोविडने गाशा गुंडाळायला सुरवात केलीय. संसर्गाचा दर तीन टक्‍क्‍यांवर घसरला. लसीकरणाने 65 हजारांचा टप्पा ओलांडला. हार्ड इम्युनिटीकडे पावले पडू लागलीत. तालुक्‍याच्या दृष्टीने ही "गुड न्यूज' आहे. (Vikhe Patil's constituency on the way to coronation)

खासगी कोविड सेंटर ओस पडलीत. लाट भरात असताना रोज तीनशेहून अधिक बाधित असायचे. काल पंधराशे चाचण्या झाल्या; बाधित होते केवळ 64. सोळा गावांत एकही नवा रुग्ण नव्हता. 31 गावांतील रुग्णसंख्या एक आकडी आहे. 61पैकी 47 गावांतून कोविड गाशा गुंडाळतोय. राहाता शहरात गेल्या नऊ दिवसांत रोज सरासरी दीडशे चाचण्या केल्या; त्यांत केवळ दोन रुग्ण आढळले. शिर्डीची परिस्थितीही याहून वेगळी नाही. 

लसीकरणाने 65 हजारांचा टप्पा ओलांडला. पहिला डोस 47 हजार जणांनी, तर दुसरा डोस 18 हजार व्यक्तींनी घेतला. दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णांची सरकारी आकडेवारी वीस हजारांवर गेली. जाणकारांच्या कयासानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या 80 टक्के असते. एक बाधित किमान पाच ते दहा जणांना बाधित करू शकतो, हे सरकारी गृहीतक लक्षात घेतले, तर घरीच बरे होणाऱ्यांची आणि लक्षणे नसल्याने आपोआप बरे झालेल्यांची संख्या 80 हजारांपर्यंत जाऊ शकते. त्यात लसीकरण झालेल्यांची संख्या गृहीत धरली, तर तालुक्‍यातील जवळपास सव्वा ते दीड लाख व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एका अर्थाने तालुक्‍याची ही हार्ड ह्युमिनिटीच्या (सामूहिक प्रतिकारशक्ती) दिशेने वाटचाल सुरू झालीय. ही तालुक्‍यासाठी "गुड न्यूज' आहे. दरम्यान, या मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

हे तर उत्तम टीमवर्क

राहाता तालुक्‍यात कोविडची लाट झपाट्याने ओसरतेय. तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू आहे. तालुक्‍याने लसीकरणात आघाडी घेतलीय. हे उत्तम "टीमवर्क'चे फलित आहे, असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

 

हेही वाचा...

ठरलं एकदाचं, मराठा आरक्षणासाठी विखे पाटलांचे नेतृत्त्व 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख