विखे पाटलांनी आरोग्य अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल - Vikhe Patil told the health officer to speak | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटलांनी आरोग्य अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल

आनंद गायकवाड
शनिवार, 24 एप्रिल 2021

कोविड संदर्भात तालुक्‍यातील महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आश्‍वी खुर्द येथे झालेल्या बैठकीत कोविड लसीवरुन झालेल्या राजकारणामुळे ते चांगलेच संतप्त झाले.

संगमनेर : "कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील, तर ते खपवून घेणार नाही... आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू, तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका,' अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना खडेबोल सुनावले. 

कोविड संदर्भात तालुक्‍यातील महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आश्‍वी खुर्द येथे झालेल्या बैठकीत कोविड लसीवरुन झालेल्या राजकारणामुळे ते चांगलेच संतप्त झाले. 

विखे पाटील म्हणाले,"" सध्याचे वातावरण गंभीर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. परंतु अशा परिस्थितीत तुम्ही मनमानी करणार असाल, तर तुमच्या विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करावीच लागेल, तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही,'' या शब्दांत त्यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्यांचा समाचार घेतला. 

तालुक्‍यातील निमगावजाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेला कोविड प्रतिबंधक लसीचा डोस डॉ. सुरेश घोलप यांनी दबावातून जोर्वे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पाठविल्याने असंख्य सामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तालुक्‍यातील निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र या आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना लस न मिळाल्याने घरी परतावे लागले होते. 

या संदर्भात विखे पाटील यांनी चौकशी करुन, प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. निमगावजाळी येथील लसींचे डोस डॉ. घोलप यांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावामुळे जोर्वे येथील उपकेंद्रात पाठवले, याबाबत तहसीलदार अमोल निकम यांना कोणतीच कल्पना नसल्याचे समजते. तसेच लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी पोलिस प्रशासन आणि गटविकास अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. तहसीलदारांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले. 

या घटनेबाबत डॉ. सुरेश घोलप यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे झाल्याने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोलप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

या बैठकीला 26 गावांमधील प्रमुख कार्यकर्ते, खासगी डॉक्‍टर, जिल्हा परिषद सदस्य ऍड. रोहिणी निघुते, रामभाऊ भुसाळ, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

दरम्यान, याबाबत महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख