वाळूच्या गाडीखाली दुचाकी सापडली अन् प्रशासनाने 15 बोटींचा केला स्फोट - A two-wheeler was found under a sand truck and the administration detonated 15 boats | Politics Marathi News - Sarkarnama

वाळूच्या गाडीखाली दुचाकी सापडली अन् प्रशासनाने 15 बोटींचा केला स्फोट

संजय आ. काटे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

गावकरी चिडले, अपघाताचे छायाचित्रण व्हायरल झाले. उद्रेक होण्याची शक्यता तयार झाली आणि मग नाईलाजाने तहसीलदार, बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी जात कारवाई सुरु केली.

श्रीगोंदे : म्हसे (ता. श्रीगोंदे) येथील घोड नदीपात्रात आठ दिवसांपासून बोटींच्या साह्याने वाळूचोरी सुरु होती. अर्थात प्रशासनाच्या सहकार्यानेच ती सुरू असल्याचे उघड गुपित होते. तक्रारी आल्या मात्र कुणीही त्याची दखल घेतली नाही. शेवटी आज सकाळी वाळूची वहातूक करणाऱ्या एका वाहनाखाली दुचाकी सापडून अपघात झाला.

गावकरी चिडले, अपघाताचे छायाचित्रण व्हायरल झाले. उद्रेक होण्याची शक्यता तयार झाली आणि मग नाईलाजाने तहसीलदार, बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी जात कारवाई सुरु केली. 

म्हसे येथील गावकऱ्यांनी वाळूचोरीला विरोध करणारा ठराव सादर केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने वाळूचोरीला मुकसंमती दिली. आठवड्यापासून तेथे पंचवीस बोटी रोज शेकडो ब्रास वाळू उपसा करीत होते. जमावबंदी आदेश सामान्यांपुरतेच असल्याचे नदीपात्रात दिसत होते. तेथे कोरोना नावालाही नव्हता. गावातून तक्रारी आल्या मात्र तहसीलदार प्रदीपकुमार पवार, बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी कानावर हात ठेवत कोरोनामुळे सवड नसल्याचे दाखविल्याने वाळूचोरांचे मनोधर्य वाढले. 

आज सकाळी वाळूची वहातूक करणाऱ्या ट्रक चालकाने दुचाकीस्वराला वाहनाखाली घेतले. ट्रकचे एक चाक त्या दुचाकीवर गेले आणि दुचाकीचालक जखमी झाला. हे सगळे चित्रण मोबाईलमध्ये झाले आणि लगेच ते व्हायरलही झाले. गावकरी संतापले आणि काही, तरी होईल असे समजताच तहसलीदार आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी धावले. अर्थात त्यांनी निघतानाही आम्ही येतोय बोटी हलवा असे निरोप दिल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, या अपघाताने का होईना पण वाळूचोरांवर कारवाई करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. तहसीलदार पवार म्हणाले, की सांयकाळपर्यंत आठ बोटी फोडल्या होत्या. पंधरा बोटी फोडून नुकसान करण्यात येईल. गुन्हा दाखल होणार नाही, कारण आम्हाला वाळूचोर कोण आहेत, याबद्दल माहिती नाही. सकाळी झालेल्या अपघाताबद्दल जर कुणी तक्रार दिली, तर तो गुन्हा पोलिस दाखल करुन घेतील. 

वाळूचोरीची तक्रार करणाऱ्यांना प्रशासनाने केले लक्ष 

म्हसे येथील वाळूचोरीची तक्रार तेथील काही समाजसेवकांनी केली होती. आज सकाळी त्या तक्रारदारांवर प्रशासनाने करडी नजर करीत गर्दी हटविण्याच्या नावाखाली त्यांना मारहाण केल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेथे मोठा संताप असून, हे प्रकरण मंत्र्यांपर्यंत नेण्याची काहींनी इशारा दिला आहे.

दरम्यान, तहसीलदार पवार यांनी मात्र हे नाकारले असून, गर्दी हटविण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख