दोन कोटी भरले; मिळाले फक्त २२ लाख, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट

अनावृष्टी, अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक आपत्तींमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे किमान केलेला खर्च तरी मिळावा, या हेतूने शेतकरी पीकविमा भरतात.
दोन कोटी भरले; मिळाले फक्त २२ लाख, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट
Pik vima.jpg

शेवगाव : मागील वर्षी खरीप पिकांसाठी विमा भरलेल्या तालुक्यातील ४४ हजार २६१ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ५३२ शेतकऱ्यांनाच विमा मंजूर करून पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तालुक्यातील २१ हजार ७०५ हेक्टर पिकांसाठी संरक्षित केलेल्या रकमेच्या दोन टक्के प्रमाणात एक कोटी ९१ लाख ३४ हजार ११४ रुपयांचा विमा भरला होता. मात्र, पिकांचे नुकसान होऊनही केवळ २२ लाख २९ हजार ३६ रुपयांचा विमा देत कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली.

तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहेत. अनावृष्टी, अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक आपत्तींमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे किमान केलेला खर्च तरी मिळावा, या हेतूने शेतकरी पीकविमा भरतात. बियाणे, खते, मशागत यावर मोठा खर्च करूनही लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या जोखमीचा फायदा आता विमा कंपन्याही मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा..

गेल्या वर्षी तालुक्यातील ४४ हजार २६१ शेतकऱ्यांनी २१ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रासाठी एक कोटी ९१ लाख ३४ हजार ११४ रुपयांचा विमा भरला होता. त्यामध्ये कपाशी, तूर, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कांदा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. गेल्या वर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरिपासह रब्बी पिकांचेही नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली. मात्र विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. विमा भरलेल्या ४४ हजार २६१ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ५३२ शेतकऱ्यांनाच विमा रक्कम मंजूर करून त्यांची एक प्रकारे फसवणूकच केली आहे.

ते सौजन्य दाखवित नाहीत

पीकविम्यासाठी शासनाने नेमलेल्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले आहेत. विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून नफेखोरी करणाऱ्या या कंपन्या नैसर्गिक आपत्तीतही विमा रक्कम देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. या विषयावर शासकीय स्तरावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करू.
- डॉ. क्षितिज घुले, सभापती, पंचायत समिती, शेवगाव

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in